इंडिगोला 40 लाख रुपये दंड

नियमभंगामुळे ‘डीजीसीए’ची कारवाई : नियमांनुसार पायलट प्रशिक्षण सिम्युलेटर न वापरल्याचा ठपका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (‘डीजीसीए’) इंडिगो एअरलाइन्सला पायलट प्रशिक्षणासाठी अयोग्य फ्लाइट सिम्युलेटर वापरल्याबद्दल 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कालिकत, लेह आणि काठमांडू सारख्या श्रेणी ‘सी’ विमानतळांवर सुमारे 1,700 पायलटना आवश्यक सिम्युलेटरवर प्रशिक्षित केले नसल्याचे एका तपासणीत आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘डीजीसीए’ने यापूर्वी 11 ऑगस्ट 2025 रोजी प्रशिक्षण संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला इंडिगोने 22 ऑगस्ट रोजी उत्तर दिले होते. परंतु ते असमाधानकारक आढळल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.

इंडिगोने चेन्नई, दिल्ली, बेंगळूर, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम आणि हैदराबाद येथे 20 सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेतले. हे सिम्युलेटर श्रेणी ‘सी’ विमानतळांसाठी पात्र नव्हते. ‘सी’श्रेणी विमानतळांवर लँडिंगमध्ये अडचणी येतात, त्यासाठी विशेष सिम्युलेटर प्रशिक्षण आवश्यक असते. त्यामुळेचे इंडिगोला दंड ठोठावण्यात आला आहे. इंडिगोला ही रक्कम 30 दिवसांच्या आत जमा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. वेळेवर पैसे न भरल्यास अधिक कठोर कारवाई होऊ शकते. इंडिगो या कालावधीत नागरी विमान वाहतूक संयुक्त महासंचालकांकडेही अपील करू शकते.

Comments are closed.