इंडिगोचा गोंधळ सुरूच; विमानसेवेच्या विलंबामुळे अमोल कोल्हे संतापले

इंडिगोने शुक्रवारी 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली, त्यामुळे विविध विमानतळांवरील मोठ्या संख्येने प्रवाशांना फटका बसला. इंडिगोने शुक्रवारी ४०० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे विविध विमानतळांवर मोठ्या संख्येने प्रवाशांचा प्रवास विस्कळीत झाला आहे. यापूर्वी, इंडिगोने 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली होती. आता 10 डिसेंबरपर्यंत इंडिगोची सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या गोंधळाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला असून त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
इंडिगोच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी इंडिगोच्या सेवेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय, असे अमोल कोल्हेंनी पोस्ट करत म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन थेट केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. इंडिगोचा हा गोंधळ हे या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचे परिणाम आहेत. पुन्हा एकदा, विलंब, विमानाचे वेळापत्रक रद्द होणे आणि हतबलता याचे परिणाम सामान्य हिंदुस्थानींना भोगावे लागत आहेत. देशाला प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा हवी आहे, जुळवलेल्या मक्तेदारीची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पुणे विमानतळावरील इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Comments are closed.