इंडोनेशियाने भारताची मागणी मान्य केली

भारतानंतर पाकिस्तानचा दौरा करणार नाहीत अध्यक्ष : प्रजासत्ताक दिनी असणार मुख्य अतिथी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. त्यांच्या या दौऱ्याविषयी अधिकृत घोषणा झाली आहे. परंतु इंडोनेशियाच्या अध्यक्षांच्या प्रस्तावित पाकिस्तान दौऱ्याला भारताच्या दौऱ्याशी जोडले जाऊ नये अशी भारताची इच्छा होती. इंडोनेशियाच्या सरकारने भारताच्या या इच्छेला मान देत पाकिस्तानचा दौरा तूर्तास लांबणीवर टाकल्याचे समजते. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे.

इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो स्वत:च्या दिल्ली दौऱ्यानंतर पाकिस्तानला जाणार नसल्याचे मानले जात आहे. प्रजासत्ताक दिनासाठी प्रबोवो यांच्या भारत दौऱ्यादम्यान पाकिस्तानचा दौरा टाळला जाऊ शकतो. सुबियांतो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी भारताचे राजनयिक अतिथी असतील. 1950 नंतर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी असण्याची ही चौथी वेळ असेल. इंडोनेशियासोबत भारताचे अत्यंत जुने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत.

भारताचे कूटनीतिक यश

अलिकडेच जी-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली होती. इंडोनेशियाचे अध्यक्ष भारत दौऱ्यानंतर मलेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अलिकडेच पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष भारताच्या दौऱ्यानंतर थेट इस्लामाबाद येथे पोहोचतील असा दावा केला होता. तर विदेशी अतिथींना स्वत:च्या भूमीवरुन थेट पाकिस्तानला न जाण्याचा आग्रह भारत करत असतो. इंडोनेशियाने भारताच्या या मागणीला दिलेला मान पाहता ही कूटनीति यशस्वी ठरली आहे.

भूतकाळात अमेरिका आणि आखाती देशांचे प्रमुख भारत आणि पाकिस्तानचा दौरा एकत्रित करत असत. परंतु भारत आता अशाप्रकारच्या दौऱ्याला विरोध करतो. भारताचा आग्रह पाहता इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. भारत सरकारने इंडोनेशियासमोर त्याच्या अध्यक्षांच्या प्रस्तावित पाक दौऱ्याचा मुद्दा कूटनीतिक स्वरुपात उपस्थित केला होता. प्रजासत्ताक दिन भारताकरता विशेष असून सरकार विदेशी नेत्यांना स्वत:च्या भारत दौऱ्याला पाकिस्तान दौऱ्यासोबत समायोजित न करण्याची सूचना करत असते. मागील काही काळात भारताच्या इच्छेचा विचार करत अनेक राष्ट्रप्रमुखांनी पाकिस्तानचा दौरा करणे टाळले आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी

फिलिपाईन्सनंतर इंडोनेशियाकडून भारतनिर्मित ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी केली जाणार आहे. याविषयी भारत आणि इंडोनेशियाच्या सरकारांदरम्यान दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती. परंतु आता चर्चा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. प्रारंभी ब्राह्मोसच्या किमतीवरून इंडोनेशियाचे संरक्षण मंत्रालय आता यावर चर्चा करण्यास तयार झाले आहे. तर ब्राह्मोसच्या किमतीवरून इंडोनेशियाच्या संवेदनांची पूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन भारताकडून देण्यात आले आहे. भारत अत्यंत सुलभ कर्ज उपलब्ध करविण्याची व्यवस्था करण्यासही तयार आहे.  दोन्ही देशांदरम्यान याविषयी चर्चा झाल्याने अध्यक्ष सुबियांतो यांच्या आगामी भारत दौऱ्यात यावर गंभीर विचारविनिमय होण्याची शक्यता बळावली आहे.

Comments are closed.