इंदूरच्या व्यावसायिकाला लॉरेन्स गँगकडून धमकी
वृत्तसंस्था/ इंदूर
मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये रिअल इस्टेट व्यावसायिक संजय जैन यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून 15 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणीही करण्यात आली आहे. इंदूरच्या तुकोगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या संजय जैन यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देताना कोट्यावधी रुपयांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही धमकी एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या नंबर, व्हॉइस मेसेज आणि व्हिडिओ कॉलची चौकशी करत आहेत. आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आल्यावर त्यांनी तो कट केला. त्यानंतर थोड्याच वेळात, त्यांना त्याच आंतरराष्ट्रीय नंबरवरून 10 कोटी रुपये देण्याची धमकी देणारा व्हॉइस मेसेज आला. जैन यांनी फोन न उचलल्यामुळे आरोपीने रक्कम वाढवली. व्हॉइस मेसेजमध्ये आरोपीने संजय जैन आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित संवेदनशील माहितीचा उल्लेख करत धमक्या दिल्यामुळे त्या व्यावसायिकाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन संजय जैन यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Comments are closed.