इंदूर पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मध्यप्रदेशातील इंदूर हे पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ नगर ठरले आहे. हा पुरस्कार या शहराने सलग आठव्या वेळेला प्राप्त करून एक विक्रम केला आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’चा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात विविध नगरांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नगरे आणि महानगरांच्या लोकसंख्येच्या आधारावर त्यांचा ‘स्वच्छता क्रमांक’ निर्धारित करण्यात आला आहे. यावेळी हे सर्वेक्षण लोकसंख्येनुसार विभागणी करून करण्यात आले होते. गोव्याची राजधानी पणजी या शहराने 20 हजार ते 50 हजार लोकसंख्येच्या विभागात भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार पटकाविण्यात यश मिळवले आहे. इंदूरला सर्वात स्वच्छ नगर हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जुलैला प्रदान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला होता. इंदूर नगराने हा पुरस्कार 10 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या नगरांच्या श्रेणीत मिळविला आहे. मोठी लोकसंख्या असणाऱ्या महानगरांच्या श्रेणीत सर्वात स्वच्छ महानगर हा पुरस्कार यावेळी गुजरातमधील अहमदाबाद या शहराने पटकाविला आहे. ही घोषणा गेल्या रविवारीच करण्यात आली होती.

सुरत दुसऱ्या स्थानावर

3 ते 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीत गुजरातमधील सुरत शहराने दुसरा क्रमांक घेतला. तर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला तिसरा क्रमांक मिळविण्यात यश आले. शहरांच्या श्रेणीत नोयडा शहराने प्रथम, चंदीगढ शहराने द्वितीय आणि कर्नाटकातील म्हैसूर शहराने तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती देण्यात आली. वर्ष 2024-25 या काळातील सर्वेक्षण हे आतापर्यंतच्या स्वच्छता सर्वेक्षणांपेक्षा अधिक व्यापक आणि कठोर होते. या सर्वेक्षणात सर्वसमावेशक विकास आणि सातत्य या घटकांचाही समावेश करण्यात आला होता. हे सर्वेक्षण करण्यासाठी 3 सहस्रांहून अधिक तज्ञ सर्वेक्षकांना नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी भारतातील विविध महानगरे, शहरे आणि नगरांना भेटी देऊन त्यांच्यामधल्या स्वच्छतेचा विस्तृत आढाला घेतला होता. स्वच्छतेचे अनेक निकष ठरविण्यात आले होते. या सर्व निकषांवर प्रत्येक नगर किंवा शहर यांची कामगिरी कशी आहे, याचा विचार करुन एक सर्वंकष निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार या शहरांना क्रमांक देण्यात आले, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

दोन मुख्य श्रेणीमध्ये विभागणी

लोकसंख्येच्या श्रेणींप्रमाणेच नगरांची विभागणी ‘सुपर स्वच्छ नगर’ (सुपर स्वच्छ लीग सिटीज) आणि ‘स्वच्छ शहर’ अशा दोन श्रेणींमध्ये करण्यात आली होती.

Comments are closed.