अलंकापुरीत इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा

आळंदी येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्या जैसे थे आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी-चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून थेट रसायन व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली. यात केमिकल रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
आळंदीतील इंद्रायणी नदीत जलपर्णीची समस्या कायम असून इंद्रायणी प्रदूषणमुक्तसाठी होणारे प्रयत्न विविध सेवाभावी संस्थांनी आंदोलने सुरू करून वाढविले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदूषित पाण्याने फेसाळल्याचे दिसत आहे. आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी, जलपर्णीसह महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधाऱ्याचे अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी नदीवरील भक्त पुंडलीक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक ‘श्रीं’च्या मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. इंद्रायणी नदी पांढऱ्या रंगाच्या फेसाने पुन्हा फेसाळल्याने नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले. पिंपरी महापालिकेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात केली असून काम अगदी संथ असल्याने पालखी सोहळ्याचे गांभीर्य दिसत नाही.
आळंदी स्मशानभूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. नदीत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्याने नदीचे पात्र उथळ झाले असून, गवताचे प्रमाण वाढले आहे. घाटाचे विकसित ठिकाणी सांडपाणी नाली टाकण्यासाठी इंद्रायणी नदी घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी आळंदीत इंद्रायणी नदी घाटावरील तोडफोडीबाबत घाट पूर्ववत करून देण्यात येणार असल्याचे अभियंता सचिन गायकवाड यांनी सांगितले.
Comments are closed.