गॅसटंचाईवरील चर्चेला उद्योगमंत्र्यांचा बांबू! ‘एकत्र बसून मार्ग काढा’, एवढा मोलाचा सल्ला देण्यासाठी उदय सामंत खास विमानाने आले
आखातातील युद्धामुळे औद्योगिक वसाहतीची दमकोंडी झाली आहे. गॅसटंचाईमुळे कारखाने बंद करण्याची वेळ आली असून, हजारो कंत्राटी कामगार बेकार झाले आहेत. कठीण परिस्थितीत आमची मदत करा, गॅस पुरवा, असा आक्रोश उद्योजक करत असताना उद्योगमंत्री उदय सामंत हे मात्र ‘बांबू’ आख्यानात रमले ! विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, उद्योजक, तेल कंपन्यांनी एकत्र बसून यावर उपाय शोधावा, असा मोलाचा सल्ला देण्यासाठी उदय सामंत हे मुंबईहून खास विमानाने आले होते!
अमेरिका, इस्त्रायलने इराणवर लादलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या झळा सोसत आहे. या युद्धाचा भारतातील औद्योगिक जगतावरही परिणाम झाला आहे. आखाताकडून होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीत हाहाकार उडाला आहे. छत्रपती संभाजीनगरात ऑटोमोबाईल, फार्मा क्लस्टर आहे. जालना येथे स्टील हब आहे. या तीनही औद्योगिक क्षेत्रांचे बहुतांश काम गॅसवर चालते. पाच मार्चपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीतील जवळपास दोन ते अडीच हजार कंपन्या अडचणीत आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार कुठेही गॅसटंचाई नाही, असे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे.
सीएमआयए, मसिआ या उद्योजकांच्या संघटनेने पुढाकार घेऊन औद्योगिक वसाहतीवर आलेल्या भीषण संकटाची कल्पना सरकारला दिली. वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे गुरुवारी सायंकाळी खास विमानाने छत्रपती संभाजीनगरला आले. उद्योजकांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत उद्योजकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. मात्र, उदय सामंत रमले बांबू आख्यानात. बांबूचे धोरण, त्याचा उपयोग याविषयी ते भरभरून बोलले. पण, उद्योगांना गॅस कधी मिळणार, याचे उत्तर त्यांनी काही दिले नाही. उलट जिल्हाधिकारी, उद्योजक, तेल कंपन्यांनी एकत्र बसन यावर उपाय शोधावा. असा सल्ला देऊन त्यांनी हात वर केले.
चिंता करू नका सरकार तुमच्या पाठीशी!
उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गॅसअभावी कोणताही उद्योग बंद पडू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. वेळ पडल्यास उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन गॅससंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊ, असेही ते म्हणाले.
संभाजीनगरातील गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांची 'चर्चा' करून समस्या सोडविण्याची सूचना
गॅस टंचाईवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरला spl फ्लाइटने भेट दिली पण एकत्र बसून चर्चा करून उद्योजकांची निराशा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांची कुचंबणा
गॅसचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. पाच मार्च रोजी केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. सध्या फक्त घरगुती गॅसच्या सुरळीत पुरवठ्यावर भर देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारच्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काहीही करा पण उद्योगांना गॅस मिळाला पाहिजे, अशी तंबी देऊन एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांची कुचंबणाच केली. केंद्राचा आदेश आणि उद्योगमंत्र्यांची तंबी अशा कात्रीत जिल्हाधिकारी सापडले आहेत.
Comments are closed.