नक्की चाललयं काय? कोच गंभीरचा 'ऑलराऊंडर प्लान' फसला, महत्वाचा खेळाडूही बाकावर

न्यूझीलंड विरुद्धच्या राजकोट वनडे सामन्यात (14 जानेवारी) भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना पाहुण्या संघाने 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांनी मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. भारताच्या या पराभवामुळे अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यातील पहिले आणि महत्वाचे कारण संघाची गोलंदाजी त्यानंतर संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. असे असताना महत्वाच्या खेळाडूला अजूनही बाकावर बसवले आहे.

भारतीय संघात काहींच्या जागेचा संभ्रम निर्माण झाला आहे. नीतीश कुमार रेड्डीला अष्टपैलू म्हणून संघात घेतले पण तो दोन-तीन षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी नाही करत आणि फलंदाजीला देखील 7व्या क्रमांकावर येतो. वनडे प्रकारात एका अष्टपैलूकडून 5-6 षटकांची गोलंदाजी आणि तुफानी फलंदाजीची आवश्यकता असते, हे दोन्ही परिणाम संघाला मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशीच काहीशी स्थिती रविंद्र जडेजाची आहे. त्याने दुसऱ्या वनडेत 8 षटकांत 44 धावा दिल्या आणि एकही विकेट काढली नाही. तसेच त्याने फलंदाजीतही कमाल केली नाही. हे दोघेही जेमतेमच फलंदाजी करत आहेत.

दुसरे आणि महत्वाचे म्हणजे अर्शदीप सिंग. त्याला संघात निवडले असून तो अजुनही या वनडे मालिकेत खेळला नाही. त्याला वारंवार बाकावर का बसवले जाते हे कळत नाही. जर त्याला विश्वचषकासाठी आराम देण्याचे ठरवले आहे तर त्याला संघातच का घेतले आहे. हेच हर्षित राणाच्या बाबतीत का नाही केले.

वनडे सामन्यात पाहिले तर भारत नियोजनानुसार फलंदाजीला सुरूवात करताना पावरप्लेमध्ये ठीक खेळतो, मधल्या षटकांमध्ये धावांची गती कमी होते आणि नंतर कोणीतरी उत्तमरित्या फिनिशरची भुमिका पार पाडली तर ठीक असे असते. राजकोट वनडेतही भारताने असेच केले होते. रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी पावरप्ले ठीक खेळला, नंतर मात्र चार विकेट्स लवकरच पडल्या. मधल्या षटकात केएल राहुलने जडेजा-रेड्डीच्या सहाय्याने 250चा टप्पा गाठला. यामुळे भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 284 धावासंख्या उभारली. यावरून फलंदाजी ठीक होती पण गोलंदाजी फसली.

एका क्षणाला तर न्यूझीलंडची फलंदाजी पाहता 285 धावांचे लक्ष्य कमी वाटत होते. त्याला अनेक कारणे त्यातील पहिले भारतीय गोलंदाजी. डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी सहज खेळत भारतीय गोलंदाजांना चांगलेच धूत तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण दीडशतकी भागीदारी केली. यामध्ये सर्वाधिक मार भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि जडेजाला बसला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि मालिका निर्णायक सामना 18 जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजयच नाही तर अर्शदीप आणि अष्टपैलू खेळाडू यांची संघातील जागा या प्रश्नांची उत्तरेही हवी आहेत.

Comments are closed.