INDvsNZ: अभिषेकच्या 8 षटकार, 5 चौकारामुळे मॅक्सवेल-रसेलच्या मोठ्या विक्रमाला सुरूंग

भारताचा टी२०मधील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने त्याच्या विशेष खेळीने क्रिकेटविश्वात वादळ आणले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) पहिला टी२० सामना खेळला गेला. यामध्ये अभिषेकने चौकार-षटकारांचा मारा करत न्यूझीलंड गोलंदाजीत खळबळ माजवली. त्याने ३५ चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी केली. याबरोबरच त्याने मोठा विक्रम करत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक पुरूषांच्या टी२०मध्ये सर्वात जलद ५००० धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे. ही कामगिरी त्याने २८९८ चेंडूतच केली आहे. याबरोबरच त्याने आंद्रे रसेल (२९४२), डीम डेविड (३१२७), विल जॅक्स (३१९६) आणि ग्लेन मॅक्सवेल (३२३९) यांना मागे टाकले आहे.

क्रिकेटमध्ये खेळाडू सर्वात कमी चेंडूत अधिक धावा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते सुरुवातच उत्तम करतात. अभिषेकही त्यापैकी एक असून तो पॉवरप्लेमध्ये संयमाबरोबरच आक्रमक खेळतो. त्यामुळे विरोधी संघांना लवकरच बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. त्याने टी२० क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा १७२च्या स्ट्राईक रेटने गाठला आहे. तर यादीतील बाकीच्यांनी १७०-१६०च्या स्ट्राईक रेटने खेळताना टी२० क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा गाठला.

अभिषेकने त्याच्या ३४ सामन्यातच भारताचा एक उत्तम सलामीवीर म्हणून स्थान पक्के केले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्ध २२ चेंडूतच अर्धशतक केले होते. यामुळे त्याने भारतासाठी आतापर्यंत आठव्यांदा टी२०मध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याचा समावेश पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात आहे.

नागपूरमध्ये झालेला हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकला. यामुळे यजमानसंघ पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० असे आघाडीवर आहे. यातील दुसरा सामना शुक्रवारी (२३ जानेवारी) खेळला जाणार आहे.

पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावांचा टप्पा गाठणारे (चेंडूनुसार)-
अभिषेक शर्मा – २८९८
आंद्रे रसेल – 2942
टीम डेव्हिड – 3127
विल जॅक – ३१९६
ग्लेन मॅक्सवेल – ३२३९

Comments are closed.