मानधनाचे वादळी शतक गेले वाया; भारताला मिळाला ‘दुहेरी धक्का’ तरीही रचला इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी शनिवारीचा दिवस थोडासा निराशाजनक ठरला. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 43 धावांनी विजय मिळवला. 413 धावांचे आव्हान पेलताना भारतीय संघ 47 षटकांत 369 धावांवर गारद झाला. या पराभवामुळे भारताने फक्त सामना नाही तर मालिका देखील 1-2 ने गमावली. येत्या 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकप 2025 पूर्वी ही मोठी धक्कादायक बाब ठरली.

तरीदेखील भारताने या पराभवातही इतिहास घडवला. प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वनडे सामन्यात भारताने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. स्मृती मानधनाने केलेल्या झंझावाती शतकाने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. केवळ 50 चेंडूत शतक झळकावून ती भारतासाठी सर्वात वेगवान वनडे शतक करणारी खेळाडू ठरली. तिच्या 63 चेंडूत 125 धावांच्या खेळीमध्ये 17 चौकार व 5 षटकार होते.

हरमनप्रीत कौरने 35 चेंडूत 52 धावा करून झुंजार साथ दिली, तर दीप्ती शर्माने 72 धावांची लढाऊ खेळी केली. पण इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियासाठी किम गार्थने तीन तर मेगन शूटने दोन बळी घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच फटका दिला. बेथ मूनीने 138 धावांची तुफानी खेळी केली. एलिसा पेरीने 68 आणि जॉर्जिया वॉलने 81 धावा केल्या. अखेरीस ऑस्ट्रेलियाचा डाव 412 धावांवर थांबला. भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर रेणुका सिंह आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मोठे आव्हान गाठता आले नाही.

Comments are closed.