INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत, टीम इंडियाची वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक!
INDW vs AUSW: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने भव्य विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हा भारताचा एकूण पाचवा उपांत्य सामना होता.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 49.5 षटकांत 338 धावा केल्या. फोएबे लिचफिल्डने दमदार खेळी करत 93 चेंडूत 119 धावा ठोकल्या, तर एलिस पेरीने 77 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. अखेरीस अॅशले गार्डनरने झंझावाती 63 धावा करून संघाचा स्कोर 300 पार नेला. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अमनजोत कौर, क्रांती गौड आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. शैफाली वर्मा केवळ 10 धावा आणि स्मृती मानधना 24 धावांवर बाद झाल्या. पण त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीने भारतीय डावाला स्थिरता दिली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भक्कम भागीदारी रचली. हरमनप्रीतने 89 धावांची महत्त्वाची खेळी केली, पण खरी जादू दाखवली ती जेमिमाने.
जेमिमा रॉड्रिग्जने 127 धावांची नाबाद शतकी खेळी करत भारताला 48.3 षटकांत विजय मिळवून दिला. ऋचा घोषनेही शेवटपर्यंत साथ दिली. ही खेळी महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रन चेसचा भाग ठरली. याआधीचा विक्रम 330 धावांचा होता, जो ऑस्ट्रेलियानेच यंदा भारताविरुद्ध केला होता.
या ऐतिहासिक विजयासह भारताने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आता 2 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
Comments are closed.