Women's World Cup: तोंडचा घास इंग्लंडने हिसकावला, टीम इंडियाच्या पराभवांची हॅट्ट्रिक

महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा 20वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियासमोर विजयासाठी 289 धावांचे लक्ष्य होते, परंतु हरमनप्रीतच्या संघाला हे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 8 गडी गमावून 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया लक्ष्यापासून 4 धावा कमी पडली. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत यांच्या उत्कृष्ट खेळीही टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. या विश्वचषकातील टीम इंडियाचा हा सलग तिसरा पराभव आहे. या विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला.

टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्सने पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. इंग्लंडकडून हीथर नाईटने 91 चेंडूत 109 धावा केल्या. तिच्या डावात तिने 15 चौकार आणि एक षटकार मारला. एमी जोन्सने 56 धावा केल्या, तर कर्णधार नॅट सेव्हर-ब्रंटने 38 धावा केल्या. सलामीवीर टॅमी ब्यूमोंटने 22 तर चार्लोट डीन 19 धावांवर नाबाद राहिली. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर श्री चरणीने 2 बळी घेतले.

भारताची सुरुवातही चांगली झाली नाही. प्रतिका रावल 6 धावा करून बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना हरलीन देओलने 31 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी तिसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाचा धावांचा पाठलाग सोपा झाला. येथून टीम इंडियाचा विजय जवळजवळ निश्चित वाटत होता. पण मानधनाच्या बाद झाल्यानंतर, दीप्ती शर्माने भारतीय डाव सावरला, परंतु दुसऱ्या टोकाकडून तिला साथ मिळाली नाही आणि शेवटी टीम इंडियाचा 4 विकेट्सनी पराभव झाला. भारताकडून मानधनाने 94 चेंडूत 88 धावा केल्या, तर कौरने 70 चेंडूत 70 धावा केल्या. दीप्तीने 57 चेंडूत 50 धावा केल्या.

Comments are closed.