INDW vs SLW: दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर नव्हे तर ‘या’ खेळाडूने पटकावला मालिकावीर पुरस्कार…

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय महिला संघाने जबरदस्त कामगिरी करत पाहुण्या संघाचा सूपडा साफ केला. महिला वनडे विश्वचषक 2025 जिंकल्यानंतर ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती आणि त्यातच संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने ही मालिका 5-0 अशी जिंकत महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा क्लीन स्वीप करण्याचा पराक्रम केला. या मालिकेत सलामीवीर शेफाली वर्मा हिची कामगिरी विशेष ठरली आणि तिला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ (POTS) पुरस्काराने गौरवण्यात आले.

मात्र, अंतिम सामन्यात शेफालीकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या सामन्यात तिने केवळ 6 चेंडूंमध्ये 5 धावा केल्या. तरीही भारताने 175 धावांचे आव्हान उभारत श्रीलंकेला 15 धावांनी पराभूत केले. संपूर्ण मालिकेत आक्रमक फलंदाजी करत शेफालीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर शेफाली म्हणाली, “मी संपूर्ण वर्ष मेहनत घेतली आणि त्याचा मला फायदा झाला. मी ज्या गोष्टींवर काम केले, त्या मैदानावर उतरवता आल्या याचा आनंद आहे. मात्र, पाचव्या सामन्यात मी खराब शॉट खेळून बाद झाले, ते पुन्हा होऊ द्यायचे नाही. मला संघासाठी अधिक योगदान द्यायचे आहे. माझे लक्ष्य दीर्घ डाव खेळणे आणि दररोज स्वतःला अधिक चांगली खेळाडू बनवणे आहे.” वनडे आणि टी20 फॉरमॅटमधील फरक सांगताना तिने म्हटले की, वनडेमध्ये संयम महत्त्वाचा असतो, तर टी20 हा तिचा आवडता फॉरमॅट असून त्यात खेळायला अधिक मजा येते.

या मालिकेत शेफालीने सर्वाधिक धावा केल्या. तिने पाच सामन्यांत 80.33 च्या सरासरीने 241 धावा केल्या शिवाय 181.20 चा स्ट्राइक रेट राखला. तिच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळकावली गेली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना या धावांच्या बाबतीत शेफालीच्या तुलनेत मागे राहिल्या. हरमनप्रीतने पाच सामन्यांत 65.00 च्या सरासरीने 130 धावा केल्या आणि अंतिम सामन्यात 68 धावांची खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली. मानधनाने चार सामन्यांत 120 धावा केल्या, तर अंतिम सामन्यात तिला विश्रांती देण्यात आली आणि 17 वर्षीय जी कमलिनी हिला पदार्पणाची संधी मिळाली.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आता शेफाली वर्माचेही नाव सामील झाले आहे. मिताली राज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी तीन वेळा हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे.

Comments are closed.