अर्भक विक्री रॅकेटला भडकले
हैदराबाद येथे 10 जणांना अटक, खोलवर पाळेमुळे
मंडळे / हैदराबाद
भाडोत्री मातृत्व (सरोगसी) आणि नवजात अर्भकांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी केंद्र या रुग्णालयाच्या चालिका अथालुरी नर्मदा यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. या रुग्णालयाच्या अनेक शाखा हैदराबाद आणि आंध्र प्रदेशात आहेत, अशी माहिती देण्यात आली असून सर्वत्र चौकशी होत आहे.
या रुग्णालय संस्थेच्या माध्यमातून भाडोत्री मातृत्व पद्धतीने (सरोगसी) अर्भकांचा जन्म होऊ दिला जात होता आणि अशा अर्भकांची विक्री केली जात होती. रविवारी रात्री उशिरा या रुग्णालयावर धाड घालण्यात आली. या कारवाईतून हा बेकायदा व्यवसाय उघडकीस आला आहे. या संस्थेच्या गोपालपुरम आणि विशाखापट्टणम येथील शाखांवरही धाड घालण्यात आली असून तेथे या बेकायदा कामांसाठी उपयोगात आणली जाणारी साधनसामग्री, भाडोत्री मातृत्वासंबंधीची कागदपत्रे, बनावट कागदपत्रे आणि डिजिटल साधने हस्तगत करण्यात आली आहेत. ही संस्था आणि या संस्थेची रुग्णालये अनुमती प्रमाणपत्राविनाच चालविण्यात येत होती, ही वस्तुस्थितीही या कारवाईतून उघड झाली आहे.
जोडप्याच्या तक्रारीमुळे भांडाफोड
या संस्थेच्या विशाखापट्टणम् येथील शाखेच्या संदर्भात एका विवाहित दाम्पत्याने केलेल्या तक्रारीमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या जोडप्याने गर्भधारणेसंदर्भात आलेल्या अडचणींमुळे या रुग्णालयातून उपचार घेतले होते. या जोडप्यातील पत्नीची शस्त्रक्रिया करावी लागेल आणि नंतर आयव्हीएफ पद्धतीच्या माध्यमातून गर्भधारणा करावी लागेल, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. त्यांनी कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून मूल होण्याचा पर्याय स्वीकारला. त्यानुसार अन्य एका महिलेल्या गर्भाशयात त्यांचे मूल वाढत असल्याचा संदेश त्यांना वेळोवेळी देण्यात आला. नंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन एक नवजात अर्भक (पुत्र) त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, त्यांना सर्व प्रक्रियेसंबंधातील बनावट कागदपत्रे आणि बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याने संशय बळावला. त्यामुळे या जोडप्याने त्यांना देण्यात आलेल्या अर्भकाचे डीएनए परीक्षण करून घेतले. या परीक्षणात ते अर्भक त्यांचे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये सादर केली. अशा प्रकारे या बेकायदा धंद्याचा भांडाफोड झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.