इंडिया-बँगलादेश सीमेवर घुसखोरीच्या रॅकेटला भडकले
7 बांगलादेशींसह 3 भारतीय दलालांना अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशींच्या घुसखोरीच्या एका रॅकेटचा बीएसएफने पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान संबंधित बांगलादेशातून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत नव्हते तर भारतातून बांगलादेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. जवळपास 8 तास चाललेल्या या कारवाईत 7 बांगलादेशी आणि 3 भारतीय दलालांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 16 मोबाईल फोन, एक दुचाकी, भारतीय चलन आणि बांगलादेशी टाका तसेच केनिया आणि इंडोनेशियन चलन जप्त करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान असे उघड झाले की भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर वाढत्या कारवाईमुळे ते भारतातून आपल्या मायदेशी म्हणजेच बांगलादेशला परतण्याचा प्रयत्न करत होते. या सुटकेसाठी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दलालांना सीमा ओलांडण्यास मदत करण्यासाठी प्रतिबांगलादेशी नागरिक 7,000 रुपये दिले होते.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या अधिकाऱ्यांनी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत एक विशेष मोहीम राबविली. सुरुवातीला पश्चिम बंगालमधील नादिया आणि मुर्शिदाबाद जिह्यांना लागून असलेल्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील जालंगी भागात सीमा चौकीमध्ये 6-7 घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. हे लोक भारतातून बांगलादेश सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफ जवानांनी त्यांना थांबण्याचे आवाहन केले. यावेळी दोघांना पकडण्यात आले तर काही जण धुक्याचा फायदा घेत भारतीय सीमेवरील जंगलात पळून गेले. अटक केलेले दोन्ही संशयित बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबतचे अन्य पाच बांगलादेशी साथीदार पळून गेले होते. ते सर्वजण सीमावर्ती गाव मधुबाना येथील एका दलालाच्या मदतीने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या घुसखोरीसाठी प्रतिव्यक्ती 7 हजार रुपये निश्चित करण्यात आले. दरम्यान, पकडलेल्या दोन बांगलादेशींपैकी एकाचा मोबाईल फोन वाजू लागला. बीएसएफ अधिकाऱ्यांनी त्याला स्पीकर चालू ठेवून फोन घेण्यास सांगितले. यावेळी दुसऱ्या बाजूला दलाल असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा ठावठिकाणा शोधत तपास यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचल्या. सकाळी 9 वाजताच्या सुमारास बीएसएफने एका छुप्या कारवाईत अन्य पाच बांगलादेशींनाही पकडले. या सर्वांमुळे आणखी 2 भारतीय दलालांची नावे उघड झाली. ही कारवाई पुढे नेत बीएसएफने त्या दोन भारतीय दलालांनाही पकडले.
Comments are closed.