महागाई आठ वर्षांच्या नीचांकी फटका
अन्न महागाई दर उणे 1.7 टक्के, आकडे घोषित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
किरकोळ महागाई दरात मोठ्या प्रमाणावर घट झालेली असून जुलै महिन्यात त्याने गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी पातळी गाठली आहे. अन्न महागाई दर तर नकारात्मक, अर्थात उणे 1.7 टक्क्यांवर पोहचला आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्याचे ग्राहक मूल्य निर्देशांकासंबंधीचे आकडे प्रसिद्ध केले असून ते दिलासादायक असल्याचे पहावयास मिळत आहे. अन्न महागाई दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने सर्वसामान्य ग्राहकाचे समधान वाढणार आहे. जुलैतील ग्राहक मूल्य निर्देशांक हा जून 2017 नंतर प्रथमच इतक्या कमी पातळीवर आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आता चांगल्यापैकी नियंत्रणा आल्या असून काही प्रमाणात त्या कमीही झाल्या आहेत, हे या आकडेवारीवरुन निश्चित होते. अन्नधान्यांचे दर गेल्या दोन महिन्यांमध्ये कमी झाले आहेत.
भाज्या, डाळी उतरल्या
ग्राहक मूल्य निर्देशांकात घट भाज्या, पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, अंडी, साखर तसेच वाहतूक आणि दूरसंचार सेवा स्वस्त झाल्याने झाली आहे. ग्रामीण भागात किरकोळ अन्नमहागाई दर उणे 1.74 टक्के, तर नागरी भागात हा दर उणे 1.90 टक्के झाला आहे. गेल्या महिन्याच्या, अर्थात जून महिन्याच्या तुलनेत त्यात 7.7 टक्के इतकी मोठी घट झाली आहे. तर एकंदर किरकोळ महागाई दरात जून महिन्याच्या तुलनेत 5.5 टक्के इतकी मोठी घट दिसून येत आहे.
एकंदर महागाई दरात घट
ग्रामीण भागात एकंदर किरकोळ महागाई दर 1.18 टक्के असून तो जून 2025 मध्ये 1.72 टक्के होता. तर अन्नमहागाईचा दर जून मध्ये उणे 0.87 होता, तो जुलैमध्ये उणे 1,74 टक्के झाला आहे. नगर भागात तो जूनमध्ये उणे 1.17 टक्के होता. तो जुलैमध्ये उणे 1.90 टक्के या पातळीवर आला आहे.
महागाई घटण्याची कारणे
समाधानकारक धान्योत्पादन, अर्थव्यवस्थेचा बळकट पाया, सेवा क्षेत्रातील महागाईची घट आणि आर्थिक व्यवस्थापनाची सक्षमता या चार आधारांवर किरकोळ महागाई दराची घसरण झाली, अशी माहिती देण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विविध वाद निर्माण होत आहेत. तरीही, भारताने अंतर्गत आर्थिक परिस्थिती योग्य राखल्याने आणि समस्या हाताबाहेर जाण्याआधी उपाय योजण्याची दक्षता घेतल्याने महागाईच्या रणक्षेत्रात गेल्या काही काळात यश मिळाले आहे.
इंधन निर्देशांकात वाढ
अन्न महागाई निर्देशांकात घट होत असताना इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा महागाई निर्देशांक मात्र वाढताना दिसून आला आहे. इंधन आणि वीज निर्देशांकात जुलैमध्ये जूनच्या तुलनेत 0.12 टक्के वाढ झाली. तर नगर भागात घरमहागाई दरात 3.17 टक्के वाढ झाली. नगर आणि ग्रामीण भागांमधील एकंदर शिक्षण महागाई निर्देशांक जुलै महिन्यात 4 टक्के राहिला. जूनच्या तुलनेत त्यात काही प्रमाणा घट बघावयास मिळाली आहे. जूनमध्ये हा निर्देशांक 4.37 टक्के इतका होता. तर नागरी आणि ग्रामीण भागातील एकंदर आरोग्य क्षेत्र महागाई दर जुलै महिन्यात 4.57 टक्के इतका राहिला. जूनच्या तुलनेत त्यात 0.19 टक्के वाढ झाली आहे. मात्र, काही क्षेत्रांचा अपवाद वगळता, एकंदर किरकोळ महागाईच्या क्षेत्रात समाधानकारक स्थिती आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
महागाई एकंदरीत नियंत्रणात…
- आर्थिक वर्ष 2025-2026 च्या अर्थसंकल्पात महागाई दरवाढीचे लक्ष्य 4.4 टवके निर्धारित करण्यात आले होते. सध्याची स्थिती राहिल्यास ध्येय गाठणार.
- योग्य अर्थव्यवस्थापन, मागणी आणि पुरवठा यांच्यातील संतुलन आणि वित्त बाजारातील चलनाची स्थिती यामुळे महागाई नियंत्रणा राहिली, असे प्रतिपादन.
Comments are closed.