महागाईचा दर 7 महिन्यांच्या निम्नतावर आदळतो

फेब्रुवारीत अवघा 3.61 टक्के, तर जानेवारीत आयआयपी दरात वाढ, 5 टक्क्यांची पातळी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

फेब्रुवारी महिन्यात ग्राहक महागाई दरात समाधानकारक घट झाली आहे. हा दर गेल्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून 3.61 टक्के राहिल्याचे केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेतही त्यात घट झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा औद्योगिक उत्पादनाचा दर वाढला असून तो 5 टक्के आठ महिन्यांमधील उच्चांकी स्तरावर गेला आहे.

ग्राहक महागाई निर्देशांकाच्या आधारावर असलेला हा महागाई दर फेब्रुवारी महिन्यात घसरल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सीपीआय किंवा ग्राहक महागाई निर्देशांक फेब्रुवारीत 3.61 टक्के राहिला. गेल्या सात महिन्यांमध्ये तो इतक्या कमी पातळीवर केव्हाही नव्हता. जानेवारी 2025 मध्ये, अर्थात मागच्या महिन्यात तो 5 टक्के होता. तर गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीत तो 3.75 टक्के होता.

भाज्या, अंडी, मांसाचे दर घसरले

भाज्या, फळे, मासे, डाळी, मांस, अंडी, तयार खाद्यपदार्थ आणि दूध तसेच दुग्धोत्पादने यांच्या दरात घट झाल्याने ग्राहक महागाई निर्देशांकातही घट झाली आहे. दर फेब्रुवारीत हा दर कमी होतच असतो. तथापि, यंदाच्या फेब्रुवारीत ही घट अधिक प्रमाणात आहे. रिझर्व्ह बँकेने वार्षिक महागाई दराचे प्रमाण 4 टक्के निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यात यश येईल, अशी शक्यता फेब्रुवारीच्या आकडेवारीने निर्माण झाली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाल्याने अन्नधान्ये आणि अन्य कृषीउत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे दर घसरले आहेत. ही स्थिती यंदाच्या पावसाळ्यापर्यंत राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही या स्थितीसंबंधी समाधान व्यक्त केले आहे.

औद्योगिक उत्पादनात वाढ

महागाईच्या आघाडीवर स्थिती समाधानकारक होत असताना, औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवरही अर्थव्यवस्थेसाठी आनंदवार्ता आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनात जानेवारी 2025 मध्ये वाढ झाली असून हा निर्देशांक 5 टक्क्यांनी वाढला आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राच्या समाधानकारक कामगिरीमुळे ही वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा दर 3.2 असल्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, डिसेंबर महिन्यातील उत्पादनवाढीचा प्रत्यक्ष दर 3.5 टक्के असल्याचे घोषित करण्यात आले आहे. जानेवारी 2024 मध्ये, म्हणजेच गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वाढदर 4.2 टक्के होता. तो या जानेवारीत 5 टक्के झाला असून ही वाढ 0.80 टक्क्यांनी जास्त आहे. वस्तू उत्पादनवाढीचा दर जानेवारीत 5.5 टक्के राहिला. तो मागच्या जानेवारीत केवळ 3.6 टक्के होता. तथापि, खाण क्षेत्राचा वाढदर काहीसा घडून 4.4 टक्के राहिला आहे. तर वीज उत्पादनाचा वाढदर 2.4 टक्के राहिला आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत आयआयपीचा वाढदर 4.2 टक्के राहिला आहे. तो गेल्यावर्षीच्या याच काळात 6 टक्के इतका होता. त्यात यावर्षी घट झाली असली तरी हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत या दरात सुधारणा होईल असे अनुमान व्यक्त होत आहे.

कृषी उत्पादनात वाढ

यंदाच्या खरीप हंगामात कृषी उत्पादनात वाढ झाल्याने अन्नधान्यांच्या महागाईचा दबाव काहीसा कमी झाला आहे. पुरवठा साखळ्यांमध्येही अडथळा नसल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहतून सुरळीत होत आहे. इंधन दर न वाढल्याने महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आर्थिक परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा असून एकंदर या आर्थिक वर्षाचा महागाई निर्देशांक चार टक्के आणि विकास दर 6.2 टक्के असा राहील असे अनुमान आहे. सध्याची आकडेवार या अनुमानाला पूरक असल्याचे दिसते.

Comments are closed.