जखमी भाजप खासदारांना डिस्चार्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागच्या गुरुवारी संसदेच्या प्रवेशद्वारात झालेल्या ढकालाढकलीत जखमी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रतापचंद्र सारंगी (69) आणि मुकेश राजपूत अशी या खासदारांची नावे आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याला ढकलून पाडले, असा त्यांचा आरोप आहे. या संबंधी राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रारही सादर करण्यात आली असून पोलिसांनी हे प्रकरण गुन्हा शाखेकडे सोपविले आहे.
प्रतापचंद्र सारंगी हे ओडीशातून खासदार म्हणून निवडून आले असून, मुकेश राजपूत हे उत्तर प्रदेशातील खासदार आहेत. पडल्यामुळे या दोन्ही खासदारांच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. आता दोघांचीही प्रकृती सुधारलेली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले होते.
प्रकरणाचे पुढे काय झाले…
गेल्या गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या आसपास संसदेच्या मकरद्वार या प्रवेशद्वारापाशी खासदारांची ढकलाढकली झाली होती. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे खासदार येथे निदर्शने करीत होते. मुद्दा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाचा होता. या संबंधात या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेले आहेत. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी खासदारांना ढकलले असा आरोप आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा तपास करीत आहे. या प्रकरणी राहुल गांधी आणि या दोन्ही खासदारांचा जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे. गुन्हा अन्वेषण शाखेने संसद सचिवालयाकडून प्रवेशद्वाराजवळचे सीसीटीव्ही फूटेज मागविले आहे.
Comments are closed.