ऋषभ पंतविना आशिया कप? सहा आठवड्यांच्या विश्रांतीमुळे स्पर्धेला मुकण्याची शक्यता

हिंदुस्थानचा झुंजार फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतला पायाला झालेल्या दुखापतीमुळे पुढील सहा आठवडे बॅट आणि ग्लोव्ह्जविना राहावे लागणार आहे. पाचव्या कसोटीत पंत नसेलच, त्याचबरोबर आशिया कपची रनधुमाळीसुद्धा सहा आठवडय़ांनीच सुरू होणार आहे. पंतची दुखापत फारशी गंभीर नसली तरी त्याला पूर्ण विश्रांती देण्याची मानसिकता बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे पंत विश्रांतीचा काळ संपताच यूएईमध्ये आशिया कपला उतरण्याची शक्यता कमीच आहे. परिणामता हिंदुस्थानला पर्यायी यष्टिरक्षकासह संघाचे रक्षण करावे लागणार आहे.

पंतच्या जागी जगदीशन

पंत ओव्हलवर उतरणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवड समितीने पर्यायी यष्टिरक्षक म्हणून नारायण जगदीशनची कसोटी संघात निवड केली आहे. नारायणला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण पंतच्या जागी ध्रुव जुरेल अंतिम संघात असेल.

दुखापतीचा तपशील आणि उपचार

मँचेस्टर कसोटीत रिव्हर्स स्वीपचा फटका मारताना पंतच्या पायावर ख्रिस व्होक्सचा यॉर्कर आदळला आणि त्याच्या पायाचे बोट प्रॅक्चर झाले. तेव्हा पंतला जखमी निवृत्त व्हावे लागले होते. पण दुसऱया दिवशी पायाला प्रॅक्चर असूनही पंत मैदानात उतरला आणि त्याने इंग्लंड च्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध लढण्याची जिद्द दाखवली. त्यानंतर पंत पुन्हा मैदानात उतरला नाही. त्याला दुखापतीतून बरे होऊन पुन्हा लवकरात लवकर मैदानात उतरायचे आहे. देशासाठी खेळणे नेहमीच आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे मी पुन्हा मैदानात परतण्याची आतुरतेने वाट पाहात असल्याचे पंत म्हणाला.

Comments are closed.