जखमी गिल संघासोबत गुवाहाटीला, दुसऱ्या कसोटीत खेळण्याचा निर्णय फिटनेसनंतर

मानदुखीमुळे कोलकाता कसोटी मधेच सोडणारा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीसाठी संघासोबत गुवाहाटीकडे रवाना होणार आहे. मात्र कसोटीतील त्याचा सहभाग हा पूर्णपणे फिटनेसवर अवलंबून असेल. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत हिंदुस्थानचा संघ 0-1ने पिछाडीवर आहे.

गिलला मानदुखी झाल्यामुळे कोलकात्यातील वुडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री डिस्चार्ज झाल्यापासून तो आयटीसी सोनार हॉटेलमध्ये संघासोबतच आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो गुवाहाटीला जातानाही संघासोबतच असेल.संघाच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गिलला पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठविण्याचा पर्याय समोर आला होता, परंतु तो नाकारण्यात आला. बीसीसीआय तसेच स्थानिक वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गिलला मैदानात उतरविण्याची इच्छा असली तरी याबाबत कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. तो फिट असेल तर गुवाहाटी कसोटीत नेतृत्व करील आणि फलंदाजीलाही उतरेल.

आफ्रिकन संघात एनगिडी आला

कॅगिसो रबाडाला साथ देण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघात लुंगी एनगिडीला स्थान देण्यात आले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीपूर्वी सरावादरम्यान एनगिडीच्या बरगडीला दुखापत झाली होती. लॉर्ड्स येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात तो शेवटची कसोटी खेळला होता. अलीकडेच तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय व टी-20 मालिका खेळला आहे.

नितीश रेड्डी गुवाहाटीला खेळणार

गिलबाबत अद्याप अनिश्चितता असल्यामुळे अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला पुन्हा कसोटी संघात घेण्यात आले आहे. तोसुद्धा सध्या संघासोबतच आहे. गिलच्या निर्णयावर त्याचे संघातील स्थान अवलंबून असेल. नितीश आधीच कसोटी संघात होता. मात्र त्याला हिंदुस्थानी ‘अ’ संघात स्थान दिल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होता. मात्र गिल जखमी होताच त्याला तत्काळ कोलकात्यात बोलावण्यात आले होते.

Comments are closed.