सर्व काही ठीक नाही झालं तर मी काय करणार? दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या स्टार गोलंदाजाचे निवृत्तीचे संकेत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अशा अनेक वेगवान गोलंदाजांना पाहिले आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र सततच्या दुखापतींमुळे त्यांना आपले करिअर प्रदीर्घ काळ टिकवता आले नाही. दुखापतींच्या याच साखळीमुळे आता इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark wood) याचेही नाव या यादीत जोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2025 च्या शेवटी झालेल्या ॲशेस मालिकेसाठी वुड पूर्णपणे फिट होऊन संघात परतला होता, मात्र पहिल्याच कसोटीत केवळ 11 षटके टाकल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली आणि तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला.
या घटनेनंतर वुडने बीबीसीशी बोलताना अत्यंत भावूक आणि स्पष्ट विधान केले आहे. मार्क वुड म्हणाला की, तो आता आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे त्याला शरीर साथ देत नसल्याची जाणीव होत आहे. तो म्हणाला, मी आता खूप हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. जर मी शरीरावर जास्त ताण दिला तर माझे खेळण्याचे दिवस तिथेच संपतील. दर सहा आठवड्यांनी मला तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करावी लागते. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीपेक्षा आता सुधारणा असली तरी, मी आता क्रिकेटव्यतिरिक्त इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे. मी सध्या पॉडकास्ट करत आहे आणि कोचिंगमध्येही रस घेत आहे.
जर पुन्हा मैदानावर उतरणे शक्य झाले नाही, तर आयुष्यात पुढे काय करायचे, याचा गांभीर्याने विचार करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. 2015 मध्ये पदार्पण केलेल्या मार्क वुडने इंग्लंडला 2019 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2022 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र आता त्याच्या या विधानामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Comments are closed.