IPL 2026: चेन्नई सुपर किंग्जच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत वाढ, धोनीसोबत 'हे' खेळाडूही मुकणार काही सामन्यांना
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ मध्ये दुखापतीचे सत्र काही थांबण्याचे नाव दिसत नाही. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या योजनांमध्ये बदल केला आहे. त्यांचे हर्षित राणा आणि आकाश दीप यांनी दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे. आता चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) दुखापतीचे धक्के बसत आहे.
सीएसके पहिले दोन हंगाम एमएस धोनीशिवाय खेळणार आहे. तो स्नायूंच्या दुखापतीमुळे (calf strain) तब्बल पाच ते सहा सामन्यांना मुकणार आहे. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस यानेही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे. त्याच्याजागी संघाने स्पेन्सर जॉन्सनला संघात घेतले आहे. आता आणखी एक खेळाडू काही सामन्यांना मुकणार अशी माहिती समोर येत आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, डेवाल्ड ब्रेविस साईड-स्ट्रेनमुळे पहिल्या दोन-तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तसेच स्पेन्सरही कदाचित पहिल्या ६-७ सामने मुकण्याची शक्यता आहे. त्याला पाठीची दुखापत झाली आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात सीएसकेचा पहिला सामना ३० मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये संघ धोनीशिवाय हंगामाची कशी सुरूवात करतो, याकडे लक्ष असणार आहे. संघ या हंगामातही ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मागील हंगामात चेन्नई कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यांनी १४ पैकी केवल ४ सामने जिंकले होते.
केकेआर आजपासून (२९ मार्च) त्यांच्या आयपीएल हंगामाची सुरूवात करत आहे. ते वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सशी भिडणार आहेत. त्यांनी संघात हर्षितच्या जागी नवदीप सैनी आणि आकाशदीपच्या जागी सौरभ दुबे यांना घेतले आहे. तसेच मथिषा पथिराणाला अद्याप श्रीलंका क्रिकेटची मंजुरी मिळालेली नाही.
Comments are closed.