दुखापतग्रस्त टीम इंडियाची पुन्हा ‘कसोटी’, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडला हरविण्याचे आव्हान

अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 फरकाने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी उद्या, 23 जुलैपासून सुरू होणाऱया चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आता यजमान इंग्लंडला हरवावेच लागेल. मात्र अर्शदीप सिंह, आकाश दीप, ऋषभ पंत व नितीशपुमार रेड्डी या खेळाडूंना दुखापत झाल्याने हिंदुस्थानच्या गोटात थोडे चिंतेचे वातावरण आहे. नितीश रेड्डी तर उर्वरित मालिकेतून बाहेर झाला असून अर्शदीप व आकाश दीप चौथ्या कसोटीत खेळणार नाहीये. त्यामुळे दुखापतग्रस्त टीम इंडियाची उद्यापासून मँचेस्टरमध्ये खरी ‘कसोटी’ लागणार आहे.

आकाश दीप बाहेर; पंत खेळणार

वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत बाकावर बसणार असल्याची माहिती टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने लढतीच्या पूर्वसंध्येला दिली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत फिट झाला असून तो खेळणार असल्याचेही गिलने सांगितले. सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात पंतने कसून सराव केलेला असून तो पूर्णतः फिट असल्याचे संकेत मिळाले होते.

आघाडीच्या फलंदाजांवर मदार

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विजय मिळवायचा असेल, तर कर्णधारासह यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, ऋषभ पंत, करुण नायर या आघाडीच्या फळीला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल. त्यानंतर अष्टपैलू खेळाडूंनी आपली भूमिका चोखपणे बजावल्यास टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता येणार आहे.

इंग्लंडच्या संघात एकमेव बदल

थरारक लॉर्ड्स कसोटीत बाजी मारून मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळविल्याने चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी यजमान इंग्लंड संघाचे मनोबल उंचावलेले आहे. कारण ही कसोटी हरल्यानंतरही त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपणार नसल्याने खरे दडपण हे टीम इंडियावरच असेल. फिरकी गोलंदाज शोएब बशीरला दुखापत झाल्याने त्याच्या जागेवर लियाम डॉवसनची संघात निवड करण्यात आली आहे. या एकमेव बदलासह बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ मँचेस्टर कसोटीत उतरणार आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर इंग्लंडचा संघ समतोल असल्याने टीम इंडियासाठी मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

कंबोजचे पदार्पण की कृष्णाला संधी?

नव्या दमाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज व प्रसिध कृष्णा चौथ्या कसोटीसाठी अंतिम अकरामधील दावेदार आहेत. आकाश दीप कमरेच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीस मुकणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला मँचेस्टर कसोटीत खेळण्याची संधी मिळणार आहे. आकाश दीपप्रमाणेच कंबोजही तिखट मारा करण्यात पटाईत आहे. तो इंग्लंड दौऱयावरील हिंदुस्थान ‘अ’ संघाचा भाग होता. त्यामुळे त्याचा येथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रश्नच येत नाही, मात्र तरीही आकाश दीपच्या जागेवर मँचेस्टर कसोटीत कंबोजचे पदार्पण होणार की कृष्णाला संधी मिळणार हे बघावे लागेल.

बुमराला खेळावेच लागणार

टीम इंडिया दुखापतीच्या ग्रहणात असल्यामुळे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला अस्तित्वाची लढाई असलेल्या चौथ्या कसोटीत खेळावेच लागणार आहे. स्वतः मोहम्मद सिराजने सोमवारीच याबाबतचे स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत हिंदुस्थानी संघ बुमरा, सिराज आणि अंशुल कंबोज किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एक अशा तीन वेगवान गोलंदाजांना खेळविणार आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, मात्र वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जाडेजा यांच्यासह कुलदीपला संधी मिळेल काय? हे उद्याच लढतीपूर्वी स्पष्ट होणार आहे.

चौथ्या कसोटीसाठी उभय संघ

हिंदुस्थानचा संभाव्य संघ ः यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शार्दुल ठापूर, रवींद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर / कुलदीप यादव, अंशुल कंबोज/प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा अंतिम संघ ः जॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप (उपकर्णधार), जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉवसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.

Comments are closed.