बाजार समिती चौकशी समितीचे प्राधिकृत अधिकारी प्रकाश जगताप यांना अखेर हटवले, सहनिबंधक योगीराज सुर्वे आता प्राधिकृत अधिकारी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची ५१ मुद्दयांवर लावण्यात आलेल्या चौकशी समितीचे प्राधिकृत अधिकारी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगता यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीदेखील शासनाला पत्र पाठवले होते.
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून
अनेक गैरव्यवहार झाले असून भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रान उठवत चौकशीची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनात देखील बाजार समितीच्या कारभाराचे वाभाडे निघाले होते. पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. यातील प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे या अधिकाऱ्यांवर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आक्षेप घेतला होता. संचालक मंडळाच्या गेल्या अडीच ते तीन वर्षात पणन संचालक यांच्याकडून विविध तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक जगताप आणि हौसारे यांना वेळोवेळी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यांची भुमिका बाजार समितीच्या थेट निर्णय प्रक्रीयेत असून त्यांच्याकडून चुकीच्या कामांना अभय मिळत आले. जगताप आणि हौसारे यांच्याकडून पारदर्शक चौकशी होईल असे वाटत नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी आणि अन्य त्रयस्त वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करण्याची मागणी लवांडे यांनी केली होती. याबाबतचे पत्र ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीदेखील राज्य मुख्यमंत्र्यांसह शासनाला पाठवत चौकशीची मागणी केली होती. यानंतर प्रकाश जगताप यांनीदेखील चौकशी समितीत उच्च स्तरीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पणन संचालकांनी प्रकाश जगताप यांच्या जागेवर योगीराज सुर्वे यांची नियुक्ती केली.
तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना
पणन संचालक विकास रसाळ यांनी दिलेल्या आदेशात १ एप्रिल २०२३ पासून आलेल्या सर्व तक्रारींची तीन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सुर्वे यांना दिले आहेत.
पणन संचालकाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या समितीकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आवश्यक ते सर्व पुरावे देऊन चौकशी समितीला सहकार्य करू. यापुढील काळातही बाजार समितीचा गैरकारभारा विरोधात लढा सुरू ठेवू. – विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट.
चौकशीतील मुद्दे
- प्रतिक्षा यादीडावलून फुलबाजारात नव्याने वाटप केलेले परवाने.
- बेकायदा पद्धतीने मर्जीतल्या लोकांना दिलेला पेट्रोल पंप प्रकरण.
- नियमबाह्य पद्धतीने दिलेले ठेके.
- अनधिकृत टपऱ्यांची उभारणी.
- अधिकारी कर्मचाऱ्यांकडून टपरी चालकांकडून होत असलेली वसुली.
- जी-५६ मोकळ्या जागांची वसुली.
- पार्किंगमध्ये बनावट पावती पुस्तकांच्या माध्यमातून वसुली.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पध्दतीने बेकायदेशीरपणे पुन्हा कामावर घेणे.
Comments are closed.