INS Guldar warship museum in Vijaydurg new tourist attraction in Konkan
भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’चा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आला असून आता ही युद्धनौका विजयदुर्गच्या खाडीत समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे.
News By Premanand Bachhav
मुंबई : भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’चा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आला असून आता ही युद्धनौका विजयदुर्गच्या खाडीत समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना ही युद्धनौका पाहता येईल, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) दिली. (INS Guldar warship museum in Vijaydurg new tourist attraction in Konkan)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती. नौदलामध्ये 40 वर्षे सेवा बजावल्यानंतर ही युध्दनौका सेवेतून निवृत्त झाली. कारवारमधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाच्यावतीने आज या युध्दनौकेची कागदपत्रे पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे संरक्षण दलातून गुलदारचे महाराष्ट्र राज्याकडे आज अधिकृतपणे हस्तांतरण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार आहेत. पाणबुडीतून समुद्रतळ आणि युध्दनौकाही दिसेल अशी योजना आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
हेही वाचा… Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी
हस्तातंर झाल्यानंतर ‘आयएनएस गुलदार’ लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल. तेथे युद्धनौका शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. त्यानंतर युद्धनौका विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल. समुद्राच्या तळाशी स्थिरावल्यानंतर या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने तीन ते चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
विजयदुर्ग परिसरात हा प्रकल्प का?
सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. यामध्ये आरमारासाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा असंख्य प्रकारच्या युद्धनौका बांधल्या जात होत्या. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघवट खाडी निश्चित करण्यात आली होती. ही खाडी सुमारे 42 किलोमीटर लांब आणि 40 ते 50 मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ, वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जात असे. तसेच आरमारी गनिमी काव्यासाठीही हे मोक्याचे ठिकाण होते. त्यामुळे विजयदुर्ग बंदराची निवड करण्यात आली आहे.
Comments are closed.