'आयएनएस इक्ष' नौदलाच्या ताफ्यात सामील

आपत्ती निवारण कार्यांना गती येणार

वृत्तसंस्था/कोची

भारतीय नौदलाला गुरुवारी ‘आयएनएस इक्षक’ हे तिसरे सर्वेक्षण जहाज प्राप्त झाले. हे सर्व्हे व्हेसेल लार्ज (एसव्हीएल) वर्गातील तिसरे जहाज आहे. आयएनएस इक्षक असे त्याचे नाव असून या युद्धनौकेमुळे नौदलाची हायड्रोग्राफिक आणि सागरी क्षमता वाढणार आहे. ‘आयएनएस इक्षक’च्या जलावतरण समारंभात जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन त्रिभुवन सिंह यांनी कमिशनिंग वॉरंट वाचून दाखवले. त्यानंतर, राष्ट्रध्वजासोबत नौदलाचा ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी युद्धनौकेच्या कर्मच्रायांनी औपचारिक सलामी दिली. जहाजाने त्याचे कमिशनिंग पेनंट फडकवल्यानंतर ते सेवेत सक्रिय झाले आहे.

‘आयएनएस इक्षक’ हे जहाज भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्यात आणि त्याची धोरणात्मक पोहोच मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आधुनिक हायड्रोग्राफिक आणि ओशनोग्राफिक प्रणाली कार्यन्वित असलेले हे जहाज हेलिकॉप्टर ऑपरेशन्स करण्यासाठीही सुसज्ज आहे. या जहाजाची ही दुहेरी भूमिका त्याचे महत्त्व आणखी वाढविते, असे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

‘आयएनएस इक्षक’ हे सर्वेक्षण जहाज म्हणून देखील काम करू शकते. तसेच गरज पडल्यास मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. हे पहिले एसव्हीएल जहाज आहे जे महिलांसाठी स्वतंत्र निवासस्थानासह डिझाइन केलेले आहे. ‘आयएनएस इक्षक’ आता अज्ञात पाण्याचे नकाशे तयार करण्यासाठी, सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांवर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी सज्ज आहे.

नौदलाकडे आता तीन सर्वेक्षण जहाजे

‘आयएनएस इक्षक’ नौदलात समाविष्ट झाल्यामुळे नौदलाकडे आता तीन सर्वेक्षण जहाजे आहेत. आयएनएस संध्याक गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये कार्यन्वित करण्यात आले होते. त्याच वर्गाचे दुसरे सर्वेक्षण जहाज आयएनएस निर्देशक, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार्यन्वित करण्यात आले होते. नौदलासाठी अत्यावश्यक असलेल्या या चार मोठ्या सर्वेक्षण जहाजांसाठीचा करार 2018 मध्ये स्वाक्षरी करण्यात आला होता.

Comments are closed.