'INS निपुण' नौदल ताफ्यात सामील.
खोल समुद्रात कोणतीही मोहीम पार पाडण्यास सक्षम
► वृत्तसंस्था/ मुंबई
तब्बल 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधलेली ‘आयएनएस निपुण’ युद्धनौका नौदलात सामील झाली आहे. भारतीय नौदलाची स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) ‘आयएनएस निपुण’ सोमवार, 31 ऑगस्ट रोजी मुंबईतील नौदल गोदीत आयोजित एका औपचारिक समारंभात कार्यान्वित करण्यात आली.
भारतीय नौदलाने सोमवारी खोल समुद्रात कोणतीही मोहीम पार पाडण्यास सक्षम असलेले जहाज ताब्यात घेतले. ‘आयएनएस निपुण’ मोठ्या लाटा आणि खराब हवामानातही स्थिर राहू शकते. ते समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या पाणबुड्या आणि खलाशांना वाचवू शकते. पाण्याखाली एखादे जहाज किंवा यंत्र नादुरुस्त झाल्यास, त्याची दुरुस्ती केली जाऊ शकते. साहजिकच नौदलाला महासागरांचे अन्वेषण करण्याची गरज भासल्यास, त्यांना ‘आयएनएस निपुण’कडून सर्व आवश्यक माहिती मिळू शकणार आहे. आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली सदस्य सामील झाल्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला आणि खोल समुद्रातील पाणबुडी बचावकार्याला एक नवीन आयाम मिळाला आहे.
समुद्राच्या खोल पाण्यात गुंतागुंतीची लष्करी आणि मदत कार्ये पार पाडण्यासाठी या जहाजात अनेक अद्वितीय वैशिष्ट्यो आहेत. आयएनएस निपुणचा जवळपास 75 टक्के भाग पूर्णपणे स्वदेशी आहे. भारतीय उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी याच्या बांधकामात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे खोल समुद्रातील मोहिमांसाठी परदेशी अवलंबित्व संपुष्टात आले आहे.
Comments are closed.