मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी, LIC च्या अर्जात मराठी ऐवजी गुजराती भाषेचा पर्याय

गेल्या काही दिवसांत मुंबईतच मराठी भाषेची गळचेपी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मुंबईत एलआयसीच्या अर्जात मराठी ऐवजी गुजराती भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या फॉर्मध्ये हा पर्याय देण्यात आला आहे ते फॉर्म गुजरातमधूनच छापून आणलेले आहेत.
बोरिवलीतील अगस्ती दाबके हे म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतात. एलआयसीमध्ये एक विमा बंद करण्यासाठी दाबकेंनी कांदिवली भागातून अर्ज घेतला. या अर्जात इंग्रजीसोबत मराठीचा पर्याय असणे अपेक्षित होता. पण मराठीऐवजी गुजरातीचा पर्याय दिला होता. या प्रकरणी दाबके यांनी विचारणा केली असता हे अर्ज गुजराच्या अहमदाबादमधून आल्याचे त्यांना कळाले. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
त्यानंतर दाबके यांनी बोरीवलीच्या एलआयसी शाखेत धाव घेतली. तिथे एलआयसी शाखेवर मुंबई विभाग असे लिहिले असताना तिथेही अर्जावर मराठी ऐवजी गुजराती पर्याय देण्यात आला होता. या संबंधित दाबके यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, एलआयसीच्या दोन्ही शाखा मुंबईत असून फॉर्मवर मराठीचा पर्याय नाही हे संतापजनक असल्याचे दाबके यांनी सांगितले.तसेच मुंबईत हे अर्ज का छापले जात नाहीत, मुंबईत गुजराती भाषा लादली जात आहे, फॉर्मवर मराठीत पर्याय असावा अशी मागणी दाबके यांनी केली.
Comments are closed.