ऊस, कापूस हवाय कशाला? आल्याची शेती करत नवा प्रयोग राबवला, 25 लाखांचे उत्पन्न मिळवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> उदय जोशी

उत्पन्नासाठी ऊस, कापूस या नगदी पिकाकडे आकर्षित होणारा शेतकरी आता या पिकांना फाटा देत नफ्याच्या शेतीकडे वळाला आहे. आष्टी तालुक्यातील एका शेतकर्‍याने यंदा शेतीचा असा जुगाड लावला की, अत्यंत कमी पाण्यात फक्त अडीच एकरात तब्बल पंचवीस लाखाचे उत्पादन घेतले आणि शेतकर्‍यांना दिशा देण्याचे काम केले.

आष्टी तालुका कायम अवर्षणग्रस्त पाण्याचे दुर्भिक्ष्य, दूध व्यवसाय हा जोड धंदा आणि कांद्याचे पीक हे पारंपरिक पीक आहे. कांद्याच्या भावात नेहमीच चढ उतार होत असतो. कांदा पदरात पडला की भाव दोन रुपये किलो अशी अवस्था आहे. अखेर कडा येथील सोनवणे वस्तीवरील शिवाजी सोनवणे आणि गणेश सोनवणे यांनी यंदा भन्नाट प्रयोग केला आहे. कांद्याच्या पिकाऐवजी माहीम जातीच्या आल्याची दहा महिन्यापूर्वी लागवड केली आणि त्यातून 25 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य, कमी पाण्यात पिक पदरात पाडून घेण्यासाठी ठिबक वापरले. रासायनिक खतांऐवजी जैविक खताचा वापर केला. पाच फुट बेड पद्धत वापरली. अडीच एकरात तब्बल चारशे क्विंटल आल्याचे उत्पादन झाले. म्हणजेच ८५० पोते आल्याने भरले. पहिल्या वर्षी अडीच एकरात मशागतीसाठी तीन लाख रूपये खर्च झाला. उत्पादन पंचवीस लाखाच्या घरात पोहोचले आहे. तर दुसर्‍या वर्षी हाच खर्च फक्त पन्नास हजार रूपये येऊ शकतो, कांद्याला हमी भाव नसल्यामुळे कांदा पिकावर रोटा फिरवून पाच फुटाचे बेड तयार करत ठिबक बसवले. आले घरात आले ते सोबत लक्ष्मी घेऊन आले, असेच म्हणावे लागेल. सोनवणेंचा हा शेतीचा प्रयोग बघण्यासाठी शेतकर्‍यांची रिघ लागली आहे. हाच प्रयोग असंख्य शेतकरी आपल्याकडे राबवत आहे.

Comments are closed.