भीमा-कोरेगाव प्रकरणात महेश राऊतला अंतरिम मदत
वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी महेश राउतला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश एम.एम. सुंदरेश आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने महेश राउतच्या याचिकेवर सुनावणी केली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यावरही तुरुंगात ठेवण्याच्या निर्णयाला महेश राउतने याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
आरोपी रुमेटाइड आर्थराइटिसने ग्रस्त असल्याचा युक्तिवाद महेश राउतच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ते सी.यू. सिंह यांनी केला. वैद्यकीय आधारावर याचिकाकर्ता अंतरिम जामिनाची मागणी करत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता हे विचारात घेत आम्ही 6 आठवड्यांच्या कालावधीसाठी वैद्यकीय जामीन देण्याच्या बाजूने आहोत असे खंडपीठाने सुनावणीवेळी म्हटले. उच्च न्यायालयाने महेश राउतची जामीन याचिका स्वीकारली होती, परंतु एनआयएच्या विनंतीवर उच्च न्यायालयाने स्वत:च्या आदेशाला एक आठवड्यासाठी स्थगित केले होते.
विशेष वैद्यकीय देखभालीची आवश्यकता
महेश राउत रुमेटाइड आर्थराइटिसने ग्रस्त असून त्याला विशेष वैद्यकीय देखभालीची आवश्यकता आहे, जी तुरुंग किंवा जेजे रुग्णालयात उपलब्ध नाही, जेथे त्याची तपासणी करण्यात आली होती असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला होता. राउत हा एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आहे. एल्गार परिषदेचे संमेलन डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती.
Comments are closed.