कतारच्या LNG कारखान्यातील स्फोटात हिंदुस्थानींसह 13 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी
कतारच्या रास लाफान एलएनजी संकुलात रविवारी रात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात हिंदुस्थानींसह 13 जणांचा मृत्यू झाला असून 66 जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थानच्या दूतावासाने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कतारच्या ऊर्जा मंत्रालयाने 13 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या दुर्घटनेनंतर अनेक जण बेपत्ता असल्याचे हिंदुस्थानच्या दुतावासाने म्हटले आहे.
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कतारने आपले उत्पादन थांबवले होते. याचा जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्यानंतर आणि इराणची पकड कमकुवत झाल्यानंतर निर्यात टर्मिनल पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सरकारी मालकीच्या कतार एनर्जीनुसार, रविवारी रात्री बरझान गॅस पुरवठा केंद्रात काम सुरू असताना स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. कतार हा जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू उत्पादकांपैकी एक असून, रास लाफान एलएनजी केंद्रातील स्फोटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे.
Comments are closed.