श्रीलंकेत ‘दित्वा’चे थैमान, 47 जणांचा मृत्यू; चक्रीवादळाचा हिंदुस्थानवरही होणार परिणाम
श्रीलंकेत दित्वा चक्रीवादळाने थैमान घातले असून याचा परिणाम हिंदुस्थानवरही होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते, दित्वा चक्रीवादळ 30 नोव्हेंबरपर्यंत हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्याजवळ दाखल होईल. यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथून आंध्र प्रदेश किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
या वादळामुळे श्रीलंकेच्या अनेक भागात पूरस्थिती असून भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत 47 नागरिकांचा मृत्यू झाला असून 21 जण बेपत्ता आहेत. दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बाधित भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी दित्वा चक्रीवादळ धडकले. वादळामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. श्रीलंकेच्या प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे. सुरक्षा आणि बचाव कार्यात अडथळा येऊ नये यासाठी परिस्थिती सामान्य होईपर्यंत श्रीलंकेतील प्रवास योजना पुढे ढकलण्याचे आवाहन पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांना केले आहे.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस आणि केलानी नदीतील वाढत्या पाणी पातळीमुळे सखल भागात पुराचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. एहेलियागोडा, यतियांतोटा, रुवानवेला, देहियोविटा, सीतावाका, डोम्पे, पदुक्का, होमगामा, कडुवेला, बियागामा, कोलोन्नावा, केलानिया, वट्टाला आणि कोलंबो आदि ठिकाणी पुराचा सर्वाधिक धोका आहे.
या वादळामुळे उत्तर, उत्तर-मध्य, मध्य आणि पश्चिम श्रीलंकेसह अनेक प्रांतांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बेटावर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने (किमी प्रति तास) जोरदार वारे वाहत आहेत. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती आहे.
Comments are closed.