अंतराळवीर सुनीता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त; अंतराळात घालवले 608 दिवस, 9 स्पेसवॉकही केले

जगप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या 27 वर्षांची मोठी आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात ‘नासा’मधून निवृत्त झाल्या आहेत. त्या 27 डिसेंबर 2025 लाच निवृत्त झाल्या असून त्यांनी जानेवारीमध्ये निवृत्तीची घोषणा हिंदुस्थानात आल्यानंतर केली आहे. सुनीता विल्यम्स यांनी आपल्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) वर तीन मिशन पूर्ण केले आहेत. तसेच मानव अंतराळ उड्डाणांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात एकूण 608 दिवस घालवले आहेत. हा आकडा कोणत्याही नासाच्या अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वात मोठा दुसरा आकडा आहे. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात नऊ स्पेसवॉक केले आहेत. याची एकूण वेळ 62 तास 6 मिनिटे इतकी होती. हा वेळ म्हणजे कोणत्याही अंतराळवीर महिलेकडून सर्वात जास्त केलेला स्पेसवॉक आहे. सुनीता विल्यम्स या मानव अंतराळ उड्डाणमध्ये पुढे राहिल्या. त्यांनी अंतराळ स्टेशनवर आपल्या नेतृत्वाने भविष्यातील मिशनसाठी पाया रचण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत सुनीता विल्यम्स यांचे कौतुक नासाचे प्रशासक जेरेड आयजॅकमॅन यांनी केले आहे. सुनीता विल्यम्स यांनी चंद्राच्या आर्टेमिस मिशन आणि भविष्यातील मंगळ ग्रहाकडे जाण्याच्या मिशनसाठी रस्ता सोपा करून ठेवला आहे, असेही ते म्हणाले.
8 दिवसांचे मिशन गेले 9 महिन्यांवर
सुनीता विल्यम्स या आपल्या चार सहकाऱ्यांसोबत 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतल्या होत्या. त्या आधी अवघ्या 8 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या होत्या. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळात तब्बल 9 महिने 14 दिवस राहावे लागले होते. या दरम्यान त्यांनी अंतराळात वेगवेगळे संशोधन आणि प्रयोग केले.
निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार
सुनीता विल्यम्स या नासामध्ये सर्वात वरिष्ठ वेतन स्तर जीएस-15 वर कार्यरत होत्या. हे ग्रेड फेडरल कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात मोठ्या पदांपैकी एक मानले जाते. नासात कार्यरत असताना त्यांना एक कोटी 30 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळत होता. या पगारासोबत रिसर्स सुविधा, काही सरकारी लाभ मिळत होते. आता सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना पगाराच्या आधारावर पेन्शन दिले जाणार आहे.
हिंदुस्थान घरासारखे
सुनीता विल्यम्स या हिंदुस्थान दौऱ्यावर आल्या आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, हिंदुस्थानात आलं म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं आहे. सुनीता विल्यम्स या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या 90 वर्षीय आई संयोगिता चावला आणि बहीण दीपा यांनाही भेटल्या. विल्यम्स व्यासपीठावरून खाली उतरून त्यांनी चावला यांच्या आईला मिठी मारली.

Comments are closed.