प्रवाशांना सोडून विमान हवेत झेपावले; एअरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे 35 जण विमानतळावर अडकले

विमानात तांत्रिक बिघाड, पक्षी धडकणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मँचेस्टर विमानतळावर संतापजनक घटना समोर आली आहे. प्रवाशांना गेटवर सोडून जेट-2 च्या विमानाने थेट स्पेनच्या दिशेने उड्डाण केले. यानंतर प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. अखेर एअरलाइन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था करत प्रवाशांना स्पेनला रवाना केले.
काय घडलं नेमकं?
मँचेस्टर येथील 35 पर्यटक स्पेनला पर्यटनासाठी चालले होते. त्यासाठी त्यांनी जेट-2 सकाळी 7 वाजताच्या विमानाची तिकिटे बुकिंग केली होती. सोमवारी त्यांनी वेळेत विमानतळावर दाखल होत आपले पासपोर्ट दाखवून आणि बोर्डिंग पास स्कॅन केला आणि विमानात जाण्यासाठी गेटवर येऊन थांबले. सुमारे 40 मिनिटे प्रवासी गेट उघडण्याची वाट पाहत होते. यानंतर काहीतरी गडबड असल्याचा प्रवाशांना संशय आला.
एका विमानतळ कर्मचाऱ्याने प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांनी सर्व माहिती दिली. यानंतर कर्मचाऱ्याने त्यांना विमान निघून गेल्याचे सांगितले. यानंतर विमानतळावर प्रवाशांनी एकच गोंधळ केला.
जेट-2 एअरलाईन्सने या घटनेला दुजोरा देत प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दिशानिर्देश यंत्रणेतील चुकीमुळे हा गोंधळ झाला. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या कथित प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे, असे एअरलाइन्सने सांगितले.

Comments are closed.