रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 9 जणांचा मृत्यू, ऐतिहासिक मठाला आग
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह विविध प्रांतांवर केलेल्या क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ल्यात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. कीव्हमध्ये चौघांचा तर खार्कीव्हमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यांतला सर्वात मोठा हल्ला असून, रशियन सैन्याने केलेल्या या हल्ल्यात युक्रेनच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचे प्रतीक असलेली ‘कीव्ह पेचेर्स्क लव्हरा’ (Kyiv Pechersk Lavra) या ऐतिहासिक मठाला आग लागली. या आगीत मठाचे मोठे नुकसान झाले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 1051 मध्ये स्थापन झालेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले ‘कीव्ह पेचेर्स्क लव्हरा’ मठ पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आहे. या हल्ल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनचे पंतप्रधान जुलिया स्व्हिरीडेन्को यांनी याला क्रूर हल्ला म्हटले आहे.
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अनेक उंच निवासी इमारती आणि वीजवाहिन्यांना लक्ष्य केल्याने सुमारे 1,40,000 नागरिक अंधारात आहेत. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चार वर्षांहून अधिक काळ चाललेला हा संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा केली. या आठवड्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या G7 बैठकीपूर्वी ही चर्चा झाली.
Comments are closed.