डॉक्टरची चूक रुग्णाच्या जीवावर बेतली; स्वादुपिंडाऐवजी यकृत काढले, डॉक्टरला अटक
डॉक्टरला पृथ्वीवरील देव म्हटले जाते. पण याच डॉक्टरमुळे एका रुग्णाला आपला जीव गमावावा लागला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरने चुकीचा अवयव काढल्याने एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात ही धक्कादायक घटना उघड झाली आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, 70 वर्षीय विल्यम ब्रायन यांना पोटाच्या डाव्या बाजूला खालच्या भागात वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना मिरामार बीच येथील एसेन्शन सेक्रेड हार्ट एमराल्ड कोस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना स्वादुपिंडामध्ये समस्या असल्याचे सांगत शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले. ब्रायन यांनी नकार दिला, मात्र डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले, असा आरोप कुटुंबाने केला आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान स्वादुपिंडाऐवजी डॉक्टरांनी यकृत काढून टाकले. तसेच यकृताजवळच्या रक्तवाहिन्या कापल्या. यामुळे अतिरक्तस्रावामुळे ब्रायन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करत त्याला अटक केली आहे.
Comments are closed.