स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट, वीजपुरवठा खंडीत झाल्याने बहुतांश सेवा ठप्प

युरोपीय देश स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे या देशांतील बहुतांश सेवा ठप्प झाल्या आहेत. नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. फ्रान्समधील काही शहरंही प्रभावित झाली आहेत. वीजपुरवठा कशामुळे खंडीत झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, संपूर्ण देशातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे स्पेनला वीज पुरवठा करणारी कंपनी रेड इलेक्ट्रिकने एका निवेदनात सांगितले.

वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे दोन्ही देशातील इंटरनेट सेवा, विमानसेवा, भुयारी सेवा, मेट्रो, ट्रेन ठप्प झाल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाईल नेटवर्कही काम करणे बंद झाले. स्पेनची राष्ट्रीय रेल्वे कंपनी रेन्फेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार 12.30 वाजता देशाचा संपूर्ण राष्ट्रीय वीज ग्रीड खंडित झाला. यामुळे ट्रेन बंद आहेत, असे रेन्फेने सांगितले.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे वार्षिक क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा माद्रिद ओपनवरही याचा परिणाम झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे स्पर्धेच्या स्कोअरबोर्डवर परिणाम झाला. कोर्टवर बसवलेले कॅमेरे बंद झाले, यामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबवण्यात आल्यामुळे ब्रिटिश टेनिसपटू जेकब फर्नलीला कोर्ट सोडावे लागले.

पोर्तुगीज वृत्तपत्र एक्सप्रेसोने दिलेल्या वृत्तानुसार, पोर्तुगीज वीज वितरक ई-रेड्सने सांगितले की, युरोपियन वीज व्यवस्थेतील समस्येमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. नेटवर्क पुनर्संचयित करण्यासाठी काही भागात वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचेही एक्सप्रेसोने आपल्या वृत्ता म्हटले आहे.

Comments are closed.