इस्रायली आणि अमेरिकन धोरणांविरुद्ध पाकिस्तानात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट बंद

इस्रायली आणि अमेरिकन धोरणांविरुद्ध तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) पाकिस्तानात हिंसक निदर्शने करत आहे. लाहोर आणि इस्लामाबादसह अनेक पाकिस्तानी शहरांमध्ये लोक शाहबाज सरकारविरुद्ध निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. जमावाचा आक्रोश पाहता अनेक शहरांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले असून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
हिंसक निदर्शनांमध्ये एक टीएलपी कार्यकर्ता आणि एक पोलिस ठार झाला. टीएलपी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि हातबॉम्बचा वापर केला. शहबाज सरकारने राजधानीकडे जाणारे रस्ते सील केले असून रावळपिंडीमध्ये कलम 144 लागू केले आहे. तसेच इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) ने शुक्रवारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाबाहेर इस्रायलविरुद्ध निदर्शने करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी टीएलपी मुख्यालयावर छापा टाकत त्यांचे नेते साद हुसेन रिझवी यांना अटक केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा एक कार्यकर्ता ठार झाला आणि 20 जण जखमी झाले, असा दावा टीएलपीने केला आहे. यानंतर पाकिस्तानात टीएलपीकडून हिंसक निदर्शने करण्यात येत आहेत.
Comments are closed.