चेन्नईची पराभवदशमी; राजस्थानचा शेवट गोड, चेन्नईचा सहज केला पराभव

आयपीएलचा किंग असलेल्या चेन्नईसाठी यंदाचाही मोसम वाईट गेला. साखळीतील तेराव्या सामन्यातही चेन्नईला विजयाचे दर्शन घेता आले नाही. आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळत असलेल्या राजस्थानने चेन्नईचा 6 विकेटनी सहज पराभव करत आपला शेवट गोड केला तर चेन्नईने आपल्या आयपीएल कारकीर्दीत सर्वात लाजीरवाणी कामगिरी करताना प्रथमच पराभवदशमी सहन केली.

चेन्नईला 187 धावांवरच रोखले

मुंबईकर आयुष म्हात्रेने पुन्हा एकदा चेन्नईसाठी झंझावाती खेळी केली. 20 चेंडूंत 43 धावा ठोकणाऱ्या आयुषने चेन्नईला सहा षटकांत सत्तरी गाठून दिली. पण त्यांचे डेव्हन का@न्वे आणि युर्विल पटेल यांनी निराशा केली. या दोघांनाही युधवीर सिंहने टिपले. मग युधवीरने रवींद्र जाडेजाचीही विकेट काढत चेन्नईला अडचणीत आणले. त्यामुळे चेन्नईची 5 बाद 78 अशी दुर्दशा झाली. मग डेवाल्ड ब्रेव्हिस (42) आणि शिवम दुबेने (39) सहाव्या विकेटसाठी 59 धावांची भर घातली. या भागीमुळे चेन्नईला दोनशेचा टप्पा सहज गाठणार असे वाटत होते. पण तेव्हाच आकाश मधवालने ब्रेव्हिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर दुबे आणि धोनीने 43 धावांची भागी केली, पण ते चेन्नईला अपेक्षित धावा ठोपून देऊ शकले नाही. मधवालने 4 षटकांत 29 धावा देत चेन्नईच्या  दुबे-धोनीला जखडून ठेवले. दुबेने 32 चेंडूंत 39 तर धोनीने 17 चेंडूंत 16 धावा केल्यामुळे चेन्नई 200 धावांचा टप्पाही ओलांडू शकली नाही. चेन्नईला 187 वर रोखणारा आकाश मधवालच राजस्थानच्या शेवट गोड करणाऱ्या विजयाचा शिलेदार ठरला.

चेन्नईची भयानक कामगिरी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असा लौकिक असलेल्या चेन्नईला सलग दुसऱ्यांदा साखळीतच बाद व्हावे लागले. आयपीएलचे 16 मोसम खेळणाऱ्या चेन्नईला प्रथमच दहा पराभवांची नामुष्की सहन करावी लागली. या पराभवात ते पाच आणि चार सामने सलग हरलेत. फक्त तीनच विजय त्यांना मिळवता आले. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या माघारीनंतर महेंद्रसिंग धोनीने चेन्नईचे नेतृत्व सांभाळले, पण त्यालाही आपल्या लौकिकास साजेसे नेतृत्व करता आले नाही. तसेच त्याला फलंदाजीतही विशेष काहीही करता आले नाही. ही त्यांची आजवरची सर्वात भयावह कामगिरी ठरली आहे.

वैभवच्या दणक्याने मोडला चेन्नईचा कणा

चेन्नईच्या 188 धावांच्या लक्ष्याचा वैभव सूर्यवंशीने अक्षरशः पालापाचोळा केला. यशस्वी जैसवाल आणि वैभव सूर्यवंशी या डावखुऱ्या सलामीवीराने गोलंदाजी पह्डून काढणारी सलामी दिली. यशस्वीने वैभवच्या साथीने 37 धावांची सलामी दिली. यात 36 धावा एकटय़ा यशस्वीच्याच होत्या. त्यानंतर वैभवची फटकेबाजी सुरू झाली आणि त्याने चेन्नईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने संजू सॅमसनच्या साथीने 98 धावांची भागी रचत सामन्यातील हवाच काढून टाकली. वैभवने 33 चेंडूंत 57 धावा ठोकत राजस्थानला विजयाचा विश्वास मिळवून दिला. संजूनेही 41 धावा फटकावत आपली कामगिरी चोख बजावली. मग ध्रुव जुरेलने 12 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकार खेचत संघाच्या विजयावर 17 चेंडू आधीच शिक्कामोर्तब केले.

Comments are closed.