कोलकात्यावर पाऊसघात, फायनलचा बोनस अहमदाबादलाच; प्ले ऑफच्या दोन लढती मुल्लानपूरला रंगणार

तब्बल दहा वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळविला जाणार होता. पण पावसाने त्यांचा घात केला. हिंदुस्थानात अनेक ठिकाणी पावसाचे संकट गहिरे होत असल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचा अंतिम सामना कोलकात्यातून अहमदाबादला फिरवला आहे. त्यामुळे बीसीसीआयचे अहमदाबाद प्रेम पुन्हा एकदा उघड झाले असून 2022 आणि 2023 मध्येही अंतिम सामना अहमदाबादलाच खेळविला गेला होता आणि आताही त्यांनाच फायनलाचा बोनस लाभला आहे. प्ले ऑफच्या पहिल्या दोन लढती मुल्लानपूरला होतील तर क्वालिफायर-2 आणि अंतिम सामना अहमदाबादच्या लाखमोलाच्या मैदानात रंगेल.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आयपीएलचा कार्यक्रम आठ दिवस पुढे ढकलावा लागल्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे उर्वरित सामने विनाअडथळा पार पाडले जावेत म्हणून तारेवरची कसरत करावी लागतेय. आठ दिवसांच्या ब्रेकनंतर आयपीएल पुन्हा सुरू झाली असली तरी स्पर्धेच्या आयोजनावर पावसाचे संकट ओढावले आहे. परवा बंगळुरूच्या चिन्नास्वामीवर असलेला बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामना एकही चेंडूंचा खेळ न होऊ शकल्यामुळे रद्द करावा लागला. हा सामना रद्द झाल्यामुळे गतविजेत्या कोलकात्यावर साखळीतच बाद होण्याचे संकट झेलावे लागले आहे. आता पुढील अनेक सामन्यांवर पावसाचे सावट असल्यामुळे बीसीसीआयने खबरदारी म्हणून हैदराबाद आणि कोलकात्याला होणारे प्ले ऑफचे चारही सामने स्थलांतरित केले आहेत.

अहमदाबादचे वर्चस्व वाढतेय

बीसीसीआयवर गेल्या चार-पाच वर्षांपासून अहमदाबादचे वर्चस्व वाढतच चालले आहे. गेल्या 2022 आणि 2023 चे अंतिम सामने अहमदाबादलाच खेळविण्यात आले होते. तसेच आयसीसी वर्ल्ड कपचे महत्त्वाचे सामने आणि अंतिम सामनाही अहमदाबादलाच वळवण्यात सचिव जय शहा यांनी बाजी मारली होती. यंदा ईडन गार्डन्सवर अंतिम सामना खेळविला जाणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र पहलगाम हल्ला आणि आता पावसाच्या अडथळय़ांमुळे आयपीएलमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून बीसीसीआय मुल्लानपूरयेथे प्ले ऑफचे क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर हे दोन्ही सामने खेळविणार आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार हे दोन्ही सामने हैदराबादला होते. तसेच क्वालिफायर-2 आणि  अंतिम सामना ईडनवर खेळला जाणार होता, जो आता पावसाच्या शक्यतेमुळे पाऊसमुक्त असलेल्या अहमदाबादला रंगेल.

2 तासांचा वाढीव वेळ

आयपीएलच्या तीन सामन्यांना आतापर्यंत पावसाचा फटका बसला आहे. उर्वरित नऊ साखळी सामन्यांदरम्यान पावसाचा व्यत्यय आल्यास सामना पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आधी ही वेळ एका तासाची होती. दोन तासांची अतिरिक्त वेळ फक्त प्ले ऑफ सामन्यांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. मात्र आता साखळी सामन्यांमध्ये पावसाचे अडथळे येत असल्यामुळे बीसीसीआय ही वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरूहैदराबाद सामना करा आता लखनौमध्ये होणार

येत्या 23 मे रोजी बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील लढत चिन्नास्वामीवर खेळविली जाणार आहे. मात्र बंगळुरूत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे हा सामना आता लखनौला स्थलांतरित करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी कोलकाता-बंगळुरू यांच्यातील सामना पावसाने वाहून गेल्यामुळे कोलकात्याचे प्ले ऑफमधील आव्हानही वाहून गेले. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकात्याला पावसाने दोनदा भिजवले. या दोन सामन्यांचा खूप मोठा फटका कोलकात्याला बसला आहे. तसेच अन्य सामन्यांनाही पावसाचा फटका बसू नये म्हणून बीसीसीआयने पावसाची कोणतीही शक्यता नसलेल्या अहमदाबाद आणि मुल्लानपूरला प्ले ऑफचे सामने खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.