IPL 2025 GT vs KKR: गिलच्या विल पुढे कोलकाता निष्प्रभ

आयपीएल 2025 जीटी वि केकेआर: काल झालेल्या कलकत्ता विरुद्ध गुजरात या सामन्यात दृढनिश्चयी शुभमन दिसला…आणि तो कालच्या सामन्यात कदाचित भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराची बीजे पेरून गेला.. नाणेफेक जिंकून कलकत्ता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने गुजरात संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले..आणि गुजरात संघाच्या सलामीवीरांनी ११४ धावांची भागीदारी करून तो निर्णय उधळून  लावला..साई सुदर्शन या स्पर्धेत स्वप्नवत खेळ करीत आहे..त्याचे तंत्र..चेंडूच्या जवळ जाऊन खेळण्याची कसोटी प्रकारातील शैली त्याला कमीत कमी धोका पत्करून धावा करण्यास मदत करते…त्याने मारलेले ऑफ ड्राईव्ह  आज डोळ्यांना आनंद देऊन गेले….पण आज शुभमन ची खेळी सरस होती…भारतीय खेळपट्टीवर तो नेहमीच राजासारखा खेळत आला आहे..आज सुद्धा तो तसाच खेळला…त्याने आणि साई ने सुरुवातीला कोणता ही धोका न पत्करता धावफलक हलता ठेवला…चौकार इतकाच त्यांनी एकेरी दुहेरी धावसंखेवर भर दिला..त्या दोघांनी पावर प्ले मध्ये फक्त ४५ धावा लावल्या…बहुदा पहिल्या काही षटकांत त्या दोघांना खेळपट्टीचा अंदाज आला असणार..ही खेळपट्टी मंद होत जाणार आणि १८० ते २०० धावा या पुरेश्या होतील याचा अंदाज आल्या कारणाने त्याने आपल्या डावाची आखणी केली…त्याच्याकडे चेंडू खेळण्यासाठी भरपूर वेळ असतो त्यामुळे तो उशीरा खेळतो आणि त्यामुळेच त्याची बाद होण्याची शक्यत कमी होत जाते….शॉर्ट आर्म पुल हा त्याचा ट्रेडमार्क फटका …त्याप्रमाणेच तो ड्राईव्ह ही तितक्याच सहजतेत खेळतो…पण आज त्याने स्लॉग स्वीप आणि लेट कट तितक्याच सहजतेने मारले.

मागील सामन्यात आपण धावबाद झालो होतो याची जाणीव होती..त्यामुळे आज त्याची सुद्धा कसर भरून काढण्याची ईच्छा त्याची असणार…साई बाद झाल्यावर त्याने बटलर सोबत ३३ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली..बटलर आज तंबू मधूनच सेट होऊन आला आहे आणि तो दिल्ली विरुद्धच्या त्याच्या खेळीचा पुढील भाग आपल्याला दाखवित आहे इतक्या सहजतेने तो खेळत होता…वेगवान गोलंदाजी खेळत असताना त्याचे फूट वर्क तो काय फॉर्म  मध्ये आहे हे दाखवित होता..शुभमन ,साई आणि बटलर यांच्या खेळीने गुजरात संघ  १९८ धावा करू शकला. १९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला कलकत्ता संघ कुठे ही ही धावसंख्या पार करतील असे दिसले नाही..जरी खेळपट्टी मंद होती तर त्यांच्याकडून तसा प्रयत्न होताना सुद्धा दिसला नाही..या स्पर्धेत सिराज दृष्ट लागावी अशी गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करीत आहे. ..आज सुद्धा त्याने तशीच गोलंदाजी केली…गुरुबाज ला त्याने पायचीत पकडून कलकत्ता संघाला पहिला धक्का दिला..त्यानंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्यांदा सुनील नारायण सोबत ४१ धावांची आणि नंतर वेंकटेश अय्यर सोबत ४१ धावांची भागीदारी केली…पण वेंकटेश अय्यर सोबत त्यांनी ३६ चेंडू घेतले…आणि इथेच कलकत्ता संघ बॅकफूटवर गेला…याच दरम्यान साई किशोर याने मधल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. ..रसेल पुन्हा एकदा रशिद चा बळी ठरला…मोईन आणि रमण यांना प्रसिद्ध ने बाद करून गुजरातचा विजय पक्का केला.

आज कलकत्ता संघाचे काही निर्णय हे मनाला न पटणारे होते.. डीकॉक सारखा फलंदाज बाहेर करणे..आणि इम्पॅक्ट म्हणून रघुवंशी याला शेवटी आणणे…खरे तर कलकत्ता संघाकडून अजिंक्य नंतर सगळ्यात चांगला कोणी खेळत असेल तर तो रघुवंशी…त्याच्याकडे फटके आहेत…आत्मविश्वास आहे. ..आज त्याला वर खेळविण्यात शहाणपणाचे ठरले असते.. एकटा अजिंक्य झुंज देताना दिसला..आणि इतर फलंदाजांना त्याच वेळी खेळत असताना खेळपट्टी मंद वाटत होती..
पण त्याच वेळी कर्णधार शुभमन याला श्रेय द्यावे लागेल..अजिंक्य आणि वेंकटेश खेळत असताना त्याने सीमारेषेवर जे क्षेत्ररक्षण लावले होते ते अफलातून होते…त्यांच्या भागीदारीत एक चौकार यायला ३४ चेंडू लागले यातच गुजरातच्या गोलंदाजी आणि त्यांचे क्षेत्ररक्षण काय होते याचा अंदाज येतो..कर्णधार म्हणून शुभमन याने आपल्या गोलंदाजांचा केलेला वापर …त्याने लावलेले क्षेत्ररक्षण त्याची खेळाची समज सांगून गेले..अर्थात याचे थोडे श्रेय नेहरा गुरुजींना सुद्धा द्यावे लागेल…खेळ चालू असताना सतत सीमारेषेवर येऊन काही बारकावे सांगणारे नेहरा गुरुजी एकमेव आहेत….हा अनुभव गुजरात संघाच्या माजी कर्णधार हार्दिक लां सुद्धा आहे आणि आता शुभमन ला सुद्धा…आज शुभमन ज्या प्रकारे खेळत होता..तेव्हा त्याची देहबोली त्याला हा सामना जिंकायचा आहे हेच दाखवित होती.. तो जेव्हा फलंदाजी करीत होता तेव्हा आणि तो जेव्हा आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण लावीत होता तेव्हा ही…ही आय पी एल स्पर्धा आता हळू हळू मध्यंतर पार करून पुढे जात आहे….गुजरात पंजाब..मुंबई सारखे संघ आता हार मानायला तयार नाहीत…या तिन्ही संघामध्ये भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधार लपला आहे आणि तो त्यांना ही माहित आहे.. आय पी एल ही स्पर्धा त्या साठीची कदचित लिटमस टेस्ट ठरू शकते….२५ मे ला आय पी एल नावाची देवसेना यापैकी कोणता बाहुबली जिंकतो हाच काय तो प्रश्न…

संबंधित ब्लॉग:

CSK vs MI IPL 2025: वानखेडेवर मुंबईकरांचा जलवा

अधिक पाहा..

Comments are closed.