IPL 2005 – गुजरातचा नंबर पहिला

दिल्लीचे 200 धावांचे आव्हान गुजरातच्या साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलने बिनबादच गाठत खणखणीत विजयासह आयपीएलच्या प्ले ऑफने धडक मारण्यात पहिला नंबर मिळवला. या विजयामुळे पंजाब आणि बंगळुरू प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. आता मुंबई आणि दिल्लीपैकी एक संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. सुदर्शनने गिलसह 205 धावांची अभेद्य सलामी देताना 108 धावांची नाबाद शतकी खेळीही साकारली आणि 617 धावांसह ‘ऑरेंज पॅप’वर पुन्हा एकदा कब्जा मिळवला.

गेल्या 59 सामन्यांत केवळ 4 शतके साकारली गेली होती. तीसुद्धा डावखुऱ्या फलंदाजांनी शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता. मात्र आज के. एल. राहुल शतक झळकावणारा पहिला उजव्या हाताचा फलंदाज ठरला. तर दोन तासांनी डावखुऱ्या साई सुदर्शनने 56 चेंडूंत शतकाला गवसणी घातली. तसेच त्याने गिलसह सातवी शतकी भागीही रचली. सुदर्शन आणि गिलचा खेळ इतका भन्नाट होता की दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला यांना सापळा रचून बाद करता आले नाही. सुदर्शनने आपल्या 61 चेंडूंत 12 चौकार आणि 4 षटकार खेचले.

राहुलचाही शतकी ब्लास्ट

आज दिल्लीसाठी राहुल तुफान खेळला. फाफ डय़ुप्लेसिस (5) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर राहुलने आपल्या फलंदाजीचा झंझावात दाखवताना 3 दमदार भागी रचत संघाला 199 पर्यंत नेले. त्याने अभिषेक पोरेलसह 90 धावांची भागी केली. मग अक्षर पटेलबरोबर 45 तर ट्रिस्टन स्टब्जसह 48 धावांची भागी रचली. राहुल शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 60 चेंडूंत आपले शतकही साकारले. त्याने नाबाद 112 धावा ठोकल्या.

Comments are closed.