आयपीएलचे नेतृत्व देशी झाले! दहापैकी नऊ संघांच्या नेतृत्वपदी हिंदुस्थानचे धडाकेबाज खेळाडू

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात संघव्यवस्थापन परदेशी खेळाडूंच्या हातात मोठय़ा जोशात नेतृत्व सोपवायचे. पण आता हळूहळू हा ट्रेंड बदलत चालला असून आता आयपीएलच्या संघांचे पहिले प्रेम देशी खेळाडू झाले आहेत. यंदाच्या मोसमात तर दहापैकी चक्क नऊ संघांचे नेतृत्व टीम इंडियाच्या खेळाडूंकडे सोपविण्यात आले असून केवळ सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्स हा एकटाच परदेशी कर्णधार नेतृत्वपदी कायम आहे.

आजवर विदेशी कर्णधारांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीच या स्पर्धेवर आपला दबदबा राखला आहे, हेसुद्धा कुणी नाकारू शकत नाही. विशेष म्हणजे आयपीएलचे सुरुवातीचे दोन हंगाम विदेशी कर्णधारांनीच जिंकलेत. 2008 साली खेळली गेलेली पहिल्या आयपीएलला राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नच्या नेतृत्वाच्या जोरावर जिंकले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी तोच करिश्मा ऑस्ट्रेलियाच्याच महान ऍडम गिलख्रिस्टने करून दाखवला. त्याने डेक्कन चार्जर्सला विजेतेपदाचा मान मिळवून दिला. त्यानंतर डेक्कन चार्जर्स संघ बंद करण्यात आला आणि हैदराबादच्या या संघाचे सनरायझर्स हैदराबाद असे नामकरण करण्यात आले.

आतापर्यंत सनरायझर्सने गेल्या आठ वर्षांत  दोन वेळा बाजी मारलीय. 2016 साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाने सनरायझर्सला विजेते बनवले आणि गेल्या मोसमात पॅट कमिन्सच्या कल्पक नेतृत्वाने तीच किमया करून दाखवली. याचाच अर्थ आतापर्यंत 17 पैकी 4 जेतेपदे विदेशी अर्थात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जिंकून दिलीत. पण आता परदेशी नेतृत्वापेक्षा देशी नेतृत्वच आयपीएल फ्रेंचायझीजना अधिक भावू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत आयपीएलचे दहाच्या दहा संघांचे नेतृत्व टीम इंडियाच्या खेळाडूंकडेच आले तर कुणालाही याचे आश्चर्य वाटणार नाही. कारण आता एकटा कमिन्सच उरला आहे.

Comments are closed.