चेन्नईचे पॅकअप; पंजाबची झेप; चहलचे 19वे षटक ठरले टार्निंग पॉईंट

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने 2 चेंडू राखून विजय मिळवत यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे पॅकअप केले. या विजयासह पंजाबने गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली. लेगस्पिनर युझवेंद्र सिंगने हॅट्ट्रिकसह टिपलेले 4 बळींचे 19 वे षटक या सामन्यातील टार्निंग पॉईंट ठरले हे विशेष!

चेन्नईकडून मिळालेले 191 धावांचे लक्ष्य पंजाबने 19.4 षटकांत 6 बाद 194 धावा करीत पूर्ण केले. यात कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. त्याने 41 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांचा घणाघात केला. याचबरोबर प्रभसिमरन सिंग (54), प्रियांश आर्य (23) या सलामीच्या जोडीसह शशांक सिंगने (23) उपयुक्त खेळी केली. चेन्नईकडून खलील अहमद व मथीशा पाथीराना यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर रविंद्र जाडेजा व नूर अहमद यांना 1-1 बळी मिळाला.

चहलमुळे चेन्नईची कोंडी

नर युझवेंद्र चहलने 19व्या षटकात चार बळींसह सुरेख हॅटट्रिक मिळवली. त्यामुळे पंजाब किंग्जने आयपीएलमध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्जला 19.2 षटकांत 190 धावांत गुंडाळले. सॅम करनच्या (47 चेंडूंत 88 धावा) अर्धशतकी तडाख्यानंतर चेन्नईचा संघ ढेपाळला.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पंजाबने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र अर्शदीप सिंगने शेख रशीद (11), तर माकाx यान्सेनने आयुष म्हात्रेला (7) बाद करून चेन्नईची 2 बाद 22 अशी स्थिती केली. चौथ्या क्रमांकावरील रवींद्र जडेजा (17) हरप्रीत ब्रारचा शिकार ठरला. मात्र त्यानंतर करनने डेवाल ब्रेविससह चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. करनने 9 चौकार व 4 षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले, तर ब्रेविसने 32 धावा केल्या.

15व्या षटकात ब्रेविस, तर 18व्या षटकात करन माघारी परतला. मग 19व्या षटकात पहिल्या चेंडूवर महेंद्रसिंह धोनीने चहलला षटकार लगावला. मात्र पुढच्याच चेंडूवर चहलने धोनीला (4 चेंडूंत 11) बाद केले. त्यानंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे दीपक हुडा, अंशुल पंबोज व नूर अहमद यांना बाद करून चहलने कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली. 2022मध्ये राजस्थानकडून खेळतानाही त्याने कोलकाताविरुद्ध हॅटट्रिक मिळवली होती. अखेरच्या 20व्या षटकात मग अर्शदीपने शिवम दुबेचा अडसर दूर करून चेन्नईचा डाव संपुष्टात आणला. 18 षटकांनंतर 5 बाद 177 धावांवर असणारा चेन्नईचा संघ 19.2 षटकांत 190 धावांत गारद झाला.

Comments are closed.