IPL 2025 – राजस्थान रॉयल्सच्या अडचणींमध्ये वाढ, संजू सॅमसनची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरणार

आयपीएलला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनराइझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. परंतु पहिल्या सामन्यापूर्वीच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे राजस्थानच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन सध्या दुखापतीमुळे बराच काळ संघातून बाहेर आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघातून बाहेर आहे. राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे संघासाठी त्याची उपस्थिती महत्त्वाची आहे. IPL 2025 पूर्वी बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलेंसच्या माध्यामातून त्याला फलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याच्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या संदर्भात अजून ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. सेंटर ऑफ एक्सिलेंसमधील फिजीओ संजू सॅमसनच्या फलंदाजीच्या क्षमतेवर समाधानी आहेत. त्यामुळे संजू सॅमसन आयपीएलमध्ये फलंदाजी करताना दिसेलच.
जर संजू सॅमसनला यष्टीरक्षण करण्याची परवानगी मिळाली नाही, तर त्याच्या जागी ध्रुव जुरेलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येईल. ध्रुव जुरेलला संघाने 14 कोटी रुपयांना कायम ठेवले होते. विशेष म्हणजे ध्रुव जुरेल व्यतिरिक्त संघात इतर यष्टीरक्षकाचा समावेश नाही. त्यामुळे संघ काहीचा अडचणीत सापडला आहे.
Comments are closed.