IPL 2025 वैभव शतकवंशी! चौदाव्या वर्षीच ठोकले 35 चेंडूंत शतक, क्रिकेटविश्वात कुमारवयीन फटकेवीराचा सूर्योदय

दहा दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱया 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या जगाला तोंडात बोटं घालायला भाग पाडताना 35 चेंडूंत घणाघाती शतक ठोकण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरलेल्या वैभवची ही खेळी दुसरी वेगवान शतकी खेळी ठरली. एवढेच नव्हे तर, टी-20 क्रिकेट इतिहासातीलही तो सर्वात तरुण शतकवीर ठरला आहे. त्याच्या या खेळीमुळे तो सूर्यवंशी नव्हे, तर क्रिकेटचा शतकवंशी म्हणून त्याचा सूर्योदय झाला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने अव्वल नंबर गुजरातचे 210 धावांचे आव्हान 16व्या षटकातच पार पाडले. मात्र या विजयानंतरही राजस्थानचे आव्हान संपल्यातच जमा आहे.

आजचा दिवस हिंदुस्थानी क्रिकेट आणि आयपीएलसाठी वैभवशाली ठरला. वयाच्या 13व्या वर्षीच वैभव सूर्यवंशीचे फटके पाहून राजस्थानने 1 कोटी 10 लाख रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्याकडे घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आज वैभवने आपला खेळ दाखवत आपली किंमत वाढवली. त्याच्या फटक्यांची ताकद पाहून जयपूरच्या स्टेडियममध्ये रॉकेटची आतषबाजी होत असल्याचा अनुभव क्रिकेटप्रेमींनी अनुभवला.

वैभवच्या फटक्यांनी रचले विक्रम

– 14 वर्षे आणि 32 दिवसांच्या वैभवच्या बॅटमधून निघणारी प्रत्येक धाव विक्रमी ठरली. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वैभवने आपल्या पहिल्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार खेचत खळबळ माजवली होती तर आजची खेळी त्याच्या दहा पावले पुढे होती.
– वैभवने 17 चेंडूंत 6 षटकार आणि 3 चौकार ठोकत अर्धशतक साजरे केले. म्हणजे त्याच्या 51 धावांमध्ये चौकार षटकारांचा वाटा 48 धावांचा होता.
– वैभवने पदार्पणवीर करीम जनतच्या एका षटकांत 6,4,6,4,4,6 अशा 30 धावा चोपून काढल्या. तसेच इशांत शर्माच्या षटकात 6,6,4,0,6,4 (2 धावा वाईडच्या) असे फटके मारत 28 धावा वसूल केल्या.
– वैभवने 35 चेंडूंत 11 षटकार आणि 7 चौकार ठोकत आयपीएल इतिहासातील दुसरे वेगवान शतक साजरे केले. 30 चेंडूंत शतकाचा विक्रम गेलच्या नावावर आहे.
– वैभवने आपल्या खेळीत 18 चेंडूंत चौकार-षटकारांची बरसात करत 94 धावा काढल्या. उर्वरित धावा 17 चेंडूंत निघाल्या.

डावखुऱया शतकवीरांचा बोलबाला

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात डावखुऱया इशान किशनने नाबाद 106 धावांची खेळी करत शतकांचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर अर्धशतकांनी 93 चा आकडा गाठला असला तरी शतकांची संख्या चारवरच पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही चारही शतके डावखुऱया फलंदाजांच्याच बॅटमधून निघाली असून ते चौघेही हिंदुस्थानी फलंदाज आहेत. इशाननंतर प्रियांश आर्या आणि नंतर अभिषेक शर्माने वेगवान शतक ठोकले. या चार शतकांशिवाय आतापर्यंत पाच खेळाडूंनी नव्वदीही गाठली आहे.

गिलच्या झंझावातामुळे गुजरात 209

शुभमन गिलच्या 50 चेंडूतील 84 आणि त्याला सुदर्शन (39) आणि जॉस बटलरने (50ना.) दिलेल्या साथीमुळे गुजरात 4 बाद 209 धावा करू शकली होती.

Comments are closed.