SRHvsLSG: अभिषेक शर्माचा शून्याचा षटकार! रोहित-संजूच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची केली बरोबरी
अभिषेक शर्मासाठी २०२६ वर्ष उत्तम नाही ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मध्ये दोनदा शून्यावर बाद झाला. २०२६ च्या टी२० विश्वचषकातही तो तीनदा धाव करण्यात अपयशी ठरला होता. आता आयपीएल २०२६ मध्येही एका सामन्यात एकही धाव न करत तंबूत परतला आहे. २०२६ मध्ये तो आतापर्यंत सहावेळा शून्यावर बाद झाला आहे. टी२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा अभिषेक संयुक्तपणे पहिला भारतीय ठरला आहे.
आयपीएल २०२६ च्या दहाव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अभिषेक मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. सनरायझर्स हैद्राबादच्या उपकर्णधाराचे हे या वर्षातील सहावे शून्यावर बाद होणे आहे. टी२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या नावावर आहे. रोहित २०१८ आणि संजू २०२४ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी सहा वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
एका वर्षात भारतीय खेळाडूने सर्वाधिक वेळा टी२० मध्ये शून्यावर बाद होणे
६ – रोहित शर्मा (२०१८)
६ – संजू सॅमसन (२०२४)
६ – अभिषेक शर्मा (२०२६)
अभिषेक २०२६ मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर कूपर कॉनोलीचा क्रमांक लागतो, तो यावर्षी टी२० क्रिकेटमध्ये चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. इटलीचा अली हसन तिसऱ्या स्थानावर आहे.
यावर्षी अभिषेकने १६ डाव खेळताना ३७८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २५.२ एवढीच आहे, मात्र त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या आसपास आहे.
Comments are closed.