IPL 2026: CSK ने उघडला खजिना, अनकॅप्ड खेळाडूंवर मोठा डाव; पाहा संपूर्ण संघ एका क्लिकवर
एमएस धोनी आता चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार नसला, तरी ही फ्रँचायझी म्हणजे धोनीच अशी ओळख आजही कायम आहे. आगामी IPL 2026 साठी चेन्नई सुपरकिंग्सने आपला संघ पूर्णपणे सज्ज केला असून, यंदाच्या लिलावात संघाने आक्रमक आणि वेगळी रणनीती अवलंबल्याचे स्पष्ट दिसून आले. विशेष म्हणजे सीएसकेने यावेळी भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर मोठा विश्वास दाखवत त्यांच्यावर कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
यंदाच्या लिलावातील सर्वात मोठी चर्चा ठरली ती अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांच्याबाबत. चेन्नई सुपरकिंग्सने या दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जाणारे हे दोन्ही खेळाडू CSK च्या युवा धोरणाचा कणा ठरणार आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू अकील हुसैन यालाही 2 कोटी रुपयांत संघात स्थान देण्यात आले.
CSK ने आधीच मोठा ट्रेड करत राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला आपल्या संघात आणले आहे. या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानकडे गेले. आगामी हंगामात रुतुराज गायकवाडच संघाचे नेतृत्व करणार असल्याचे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे. तर एमएस धोनी यंदाही संघासोबत असणार असून, तो किती सामने खेळणार याबाबत उत्सुकता आहे.
आतापर्यंत पाच वेळा IPL विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी मागील काही हंगाम निराशाजनक ठरले होते. मात्र यंदा संघाने तरुण, भारतीय आणि संतुलित खेळाडूंवर भर दिल्याने CSK पुन्हा एकदा मजबूत दावेदार म्हणून पाहिली जात आहे. मार्चमध्ये IPL 2026 सुरू होण्याची शक्यता असून, यंदाचा CSK चा संघ पाहता चाहत्यांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत.
IPL 2026 मध्ये CSK ने खरेदी केलेले खेळाडू:
अकील हुसैन (2 कोटी), प्रशांत वीर (14.20 कोटी), कार्तिक शर्मा (14.20 कोटी), मॅथ्यू शॉर्ट (1.5 कोटी), अमन खान (40 लाख), सरफराज खान (75 लाख), मॅट हेन्री (2 कोटी), राहुल चाहर (5.20 कोटी)
CSK चे रिटेन खेळाडू:
रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, संजू सॅमसन
CSK ने रिलीज केलेले खेळाडू:
मथीशा पथिराना, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, विजय शंकर, शेख रशीद, आंद्रे सिद्धार्थ, कमलेश नागरकोटी, वंश बेदी, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड)
Comments are closed.