IPL 2026: मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कधी सामील होणार? मोठी अपडेट आली समोर

आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात २८ मार्चपासून होत आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी काही महत्वाचे निर्णय जाहीर केले आहे. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कबाबतही अपडेट दिली आहे.

स्टार्कच्या आयपीएलमधील उपलब्धतेबाबत फ्रॅंचायजी अजूनही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्याच्याबद्दल बदानी यांनी माध्यमांना सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कबद्दल काही माहिती मिळालेली नाही. गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल. त्यांच्या या वक्तव्यावरून सद्य स्थिती अनिश्चित असल्याचे दिसते.

स्टार्कबाबत स्पष्टता नसतानाही अक्षरने मात्र आशा बाळगली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज संघात कधीही सामील होऊ शकतो, असा विश्वास त्याने दाखवला आहे. “स्टार्क संघात कधीही येऊ शकतो, मात्र तो आला नाही तर त्याच्याजागी दुसऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला खेळवले जाईल. नटराजन चांगली कामगिरी करत असून तो १०० टक्के फिटही आहे. आवश्यकता असल्यास स्टार्क आणि इम्पॅक्ट प्लेयरबाबत विचार केला जाईल,” असे अक्षर म्हणाला आहे.

अक्षरबरोबर दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक वेणुगोपाल राव यांनाही स्टार्क लवकरच संघाशी जोडला जाणार, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले, “स्टार्क येणारच आहे, केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याच्या वर्कलोडबद्दल काळजी असून तो स्पर्धेच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मागील हंगामात त्याने ११ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला दिल्लीने लिलावात ११.७५ कोटी रुपयांना संघात घेतले आणि रिटेन केले होते. तो संघाचा प्रमुख खेळाडू असून त्याची ही तात्पुरतीची अनुपस्थिती संघासाठी परिणामकारक ठरू शकते.

यावेळी अक्षरने केएल राहुलच्या फलंदाजी क्रमांकाबाबतही माहिती दिली. राहुल आयपीएल २०२६ मध्ये सलामीला फलंदाजीसाठी येणार हे त्याने स्पष्ट केले आहे. या हंगामात दिल्लीचा पहिला सामना १ एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Comments are closed.