दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यावरही पावसाचे सावट! हेड-टू-हेड रेकॉर्ड, हवामान-खेळपट्टीचे रिपोर्ट्स; वाचा सविस्तर
आयपीएल २०२६ मध्ये आज (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील डीसी विजयाची हॅट्ट्रीक साधण्याचा प्रयत्न करेल, दुसरीकडे गुजरातच्या या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. सोमवारी (६ एप्रिल) कोलकातामध्ये झालेल्या पावसामुळे केकेआर-पीबीकेएस सामना रद्द झाला होता, तर मंगळवारी (७ एप्रिल) गुवाहाटीमध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यालाही पावसाचा फटका बसला. यामुळे दिल्लीचे हवामान कसे असेल, जे जाणून घेऊ.
दिल्लीची मागील दोन सामन्यांमधील कामगिरी पाहिली तर समीर रिझवीने लक्ष्याचा पाठलाग करताना संघाच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका निभावली. संघासाठी केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. तसेच गोलंदाजीत मुकेश कुमार आणि लुंगी एनगिडी या जोडीने उत्तम कामगिरी केली आहे. गुजरातसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे, कारण त्यांनी खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यांचा सलामीवीर साई सुदर्सन फॉर्ममध्ये असून त्याला बाकी फलंदाजांकडून मात्र चांगली साथ मिळालेली नाही.
काल (७ एप्रिल) दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांना आजच्या सामन्याबाबत चिंता वाटत आहे. अक्युवेदरच्या अंदाजानुसार, दिल्लीतील हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे, मात्र दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी स्थिती बिघडू शकते. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. तसेच सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता फारच कमी वर्तवली आहे. त्यामुळे चाहत्यांना संपूर्ण २० षटकांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, मात्र पावसामुळे वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात स्विग आणि सीम मूव्हमेंट मिळू शकते. मैदानावर सपाट खेळपट्टी आणि लहान सीमारेषा असल्याने मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता आहे. येथे नाणेफेक जिंकणारा संघ नेहमी लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत करतो. या हंगामात येथे एकच सामना खेळला गेला असून त्यात दिल्लीने १६३ धावसंख्येचे लक्ष्य १८.१ षटकात पार केले होते.
दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले गेले आहेत. त्यातील ३ सामने दिल्लीने, तर ४ सामने गुजरातने जिंकले आहेत. दिल्लीत हे दोन्ही संघ तीनदा समोरा-समोर आले. त्यातील दोन सामने गुजरातने जिंकले, तर एक सामना दिल्लीने जिंकला होता. यावरून समोरा-समोरच्या लढतीत गुजरात वरचढ दिसत आहे, मात्र सध्या दिल्ली ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहून आजच्या सामन्यात काहीही होऊ शकते.
Comments are closed.